Chinchwad : येरवडा कारागृहातून पळालेल्या आरोपीला पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक

Chinchwad: Pimpri Chinchwad police arrested an accused who escaped from Yerawada jail पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

एमपीसी न्यूज – येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या जवळ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या कारागृहातून शनिवारी (दि. 13) पहाटे दोन आरोपी पळाले. त्यातील एका आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे.

अरशद हनिफ सय्यद (वय 20, रा. सोनार चाळ, कासारवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सय्यद याच्या विरोधात खडकी, येरवडा पोलीस ठाण्यात जबरी चोरी तर वाकड आणि भोसरी पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या जवळ बार्टीच्या एका वसतिगृहात तात्पुरते कारागृह बनविण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे कारागृह बनविण्यात आले असून कारागृहातील कैद्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी हे कारागृह बनविण्यात आले आहे. शनिवारी पहाटे पावणे सहाच्या सुमारास या तात्पुरत्या कारागृहाच्या खिडकीचे गज उचकटून अरशद सय्यद आणि आकाश बाबूलाल पवार (वय 24, रा. काळेवाडी) हे दोघेजण पळाले.

या घटनेमुळे कारागृह पोलिसांसोबत पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस दलात खळबळ उडाली. दोन्ही कैदी पिंपरी चिंचवड परिसरातील रहिवासी असल्याने पिंपरी चिंचवड पोलीस अलर्ट झाले. वरिष्ठांनी याबाबत गुन्हे शाखेच्या पोलिसांना याबाबत माहिती काढून पळालेल्या कैद्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.

खंडणी दरोडा विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी आशिष बोटके आणि किरण काटकर यांना माहिती मिळाली की, अरशद सय्यद हा पिंपळे सौदागर येथील पवनामाई स्मशानभूमीजवळ कुणाची तरी वाट पाहत थांबला आहे.

या माहितीनुसार पोलिसांनी स्मशानभूमी परिसरात सापळा रचला आणि शिताफीने अरशद याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने कारागृहातून पळाल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक करून पुढील कारवाईसाठी येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कामगिरी खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर, पोलीस कर्मचारी अजय भोसले, महेश खांडे, अशोक दुधवणे, आशिष बोटके, किरण काटकर, नितीन लोखंडे, विक्रांत गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.