Chinchwad : स्वा. सावरकर व सुभाषचंद्र बोस यांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज – योगेश सोमण

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजीमहाराज हे प्रथम हिंदू पतपातशाह शकनिर्माते आहेत. त्यांच्याबद्दल वाचन, चिंतन, मनन करून त्यांच्यातील साहस, राष्ट्राप्रती निष्ठा आपल्यात निर्माण होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. अखंड हिंदुस्थान ज्यांना मानाचा मुजरा करतो. परंतू त्यांना देवत्व देणे योग्य नाही, छत्रपती शिवाजीमहाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना देवत्व दिले तर त्यांच्या शौर्याकडे, कार्याकडे आगामी काळात दुर्लक्ष होईल. अंदमान निकोबारच्या बेटावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची सुभाषचंद्र बोस यांनी भेट घेतली होती. त्यावेळी सावरकर यांनी बोस यांना ‘छत्रपती शिवाजीमहाराज यांची आग्रा येथून सुटका’ हा प्रसंग सांगितला होता. त्यातूनच सुभाषचंद्र बोस यांनी प्रेरणा घेतली होती, असे मत सुप्रसिद्ध सिने कलाकार व व्याख्याते योगेश सोमण यांनी चिंचवड येथे केले.

हिंदू स्वाभिमान दिवसनिमित्त हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष पंडीत धर्मवीर आर्य यांच्या हस्ते शनिवारी चिंचवडगाव हुतात्मा चापेकर स्मारक वाचनालय येथे झालेल्या कार्यक्रमात योगेश सोमण यांना ‘हिंदू कुलभूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आले.

  • त्याचबरोबर श्रीमती मंगलताई तुळशीराम साळुंके (1971च्या भारत पाक युध्दात हुतात्मा झालेले तुळशीराम साळुंके यांच्या वीरपत्नी) यांना वीरपत्नी पुरस्कार; महाराष्ट्र आर्य वीर दलाचे अधिष्ठाता व्यंकटेश हालिंगे यांना स्व. प्रा. एकनाथ नाणेकर स्मृती पुरस्कार व समाजसेवा पुरस्कार आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांना स्व. संजय आर्य स्मृती युवा जागृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

पुरस्कारार्थींचा मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. या वेळी योगेश सोमण यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर मार्गदर्शन केले.

  • यावेळी योगेश सोमण म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास केल्यास असे दिसते की, चिंचवडगाव येथील चापेकर कुटुंबातील वासुदेव चापेकर, दोमोदर चापेकर आणि बाळकृष्ण चापेकर आणि नाशिकमधील भगुरगावातील सावरकर कुटुंबातील बाबाराव सावरकर, विनायक सावरकर आणि नारायण सावरकर यांनी स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाची आहुती दिली, अशीही माहिती सोमण यांनी दिली.

मानपत्राचे वाचन सुजाता पोफळे, संतोष गोलांडे, ॲड. देविदास शिंदे, उत्तम दंडिमे यांनी केले. संयोजनात नगरसेवक कैलास बारणे, दिगंबर रिध्दीवाडे, दत्ता सुर्यवंशी, अतूल आचार्य, संतोष गोलांडे, कुमार पारोल, मनोज गोबे, दिनेश यादव, रमेश अर्धाले आदींनी सहभाग घेतला. स्वागत नामदेव शिंत्रे, अध्यक्षीय मनोगत राजाभाऊ गोलांडे, सुत्रसंचालन उत्तम दंडिमे, आभार सुहास पोफळे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.