Chinchwad: व्यवसाय यशस्वी होण्यासाठी कौशल्य, तंत्रज्ञानसह विश्वास महत्वाचा -डॉ. रघुनाथ माशेलकर

एमपीसी न्यूज – कोणताही व्यवसाय यशस्वी होण्यासाठी कौशल्य, तंत्रज्ञान व विश्वास महत्वाचा असतो. युवकांनी अपयशाने खचून न जाता यशस्वी होण्यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवावेत. फक्त नाविन्यपूर्ण कल्पना असून उपयोग नाही. तर, त्या कल्पना प्रत्यक्षामध्ये उतरवणे देखील आवश्यक आहे. पालकांनी देखील आपल्या पाल्यांच्या ‘स्टार्टअपस’ना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. नवे युग हे आशियाई देशांचे असून पुणे व पिंपरी-चिंचवड सारखे शहर उद्योगांचे प्रमुख केंद्र बनणार आहे. स्टार्टअप इंडियामुळे एका चळवळीला सुरुवात झाली आहे, असे मत पद्मविभूषण, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे 28 व 29 फेब्रुवारी 2020 दरम्यान आयोजित ‘फेस्टीवल ऑफ फ्युचर’ या महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महापौर उषा ढोरे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्य राजेंद्र गावडे, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, शहर अभियंता राजन पाटील, सह शहर अभियंता अशोक भालकर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, माजी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे आदी उपस्थित होते.

डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, ”तरुणांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांवर विश्वास ठेवून गुंतवणूकदारांनी त्यांच्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करावी. या महोत्सवाच्या निमित्ताने युवा उद्योजकांना गुंतवणूकदारांसमोर आपल्या कल्पना मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामाध्यमातून आपल्या उद्योगासाठी भांडवल उभे करण्यास मदत होणार आहे. महानगरपालिकेचा हा उपक्रम स्तुत्य आहे. आज चीनकडून मोठ्या प्रमाणावर स्टार्टअप उद्योगांमध्ये गुंतवणूक होत असून हे चित्र बदलण्यासाठी देशातील गुंतवणूकदरांनी स्टार्टअपसमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. कठीण परिश्रमाला पर्याय नसून युवा उद्योजकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या यशावर समाधानी होऊन थांबणे योग्य नाही”.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. तर, आभार स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.