Pimpri: सफाई कामगारांना तीन महिने मुदतवाढ; त्यासाठी होणार साडेआठ कोटी खर्च!

सात संस्थांमार्फत पुरविण्यात आले 1 हजार 529 कामगार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील रस्ते, गटार यांची साफसफाई करण्यासाठी सात संस्थांमार्फत 1 हजार 529 सफाई कामगार पुरविण्यात आले आहेत. या संस्थांच्या कामाची मुदत डिसेंबरमध्येच संपुष्टात आली आहे. मात्र, नवीन निविदा प्रकिया पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने या संस्थांनाच तीन महिने मुदतवाढ देण्यात येणार आहे. त्यासाठी साडेआठ कोटी रुपये खर्च होणार आहे.

महापालिका आरोग्य विभागामार्फत शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील रस्ते, गटार यांची साफसफाई करण्यासाठी किमान वेतन दराने कामगार उपलब्ध करण्यासाठी दोन वर्षे कालावधीसाठी निविदा मागविण्यात आली होती. त्यानुसार, किमान वेतन दरानुसार सिद्धीविनायक एंटरप्रायजेस, डी. एम. एंटरप्रायजेस, हेमांगी एंटरप्रायजेस, शुभम उद्योग, गुरूजी इन्फ्रास्ट्रक्चर, तिरूपती इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस आणि परफेक्ट अॅगसिलीटीज सर्व्हिसेस या सात संस्थांमार्फत 1 हजार 529 सफाई कामगार पुरविण्यात आले आहेत.

या सात संस्थांपैकी पाच संस्थांच्या कामाची मुदत 26 डिसेंबर 2019 १९ रोजी; तसेच दोन संस्थांच्या कामाची मुदत 31 डिसेंबर 2019 रोजी संपुष्टात आली. यानंतर पालिकेतर्फे यांत्रिक पद्धतीने रस्ते साफसफाईसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, निविदा अंतिम होण्याकरिता आणखी तीन महिने कालावधी लागणार आहे. त्यामुळे या संस्थांना अंदाजे तीन महिने कालावधीकरिता मुदतवाढ द्यावी लागणार आहे. त्याकरिता किमान वेतन दराने 7 कोटी 89 लाख रुपये आणि त्यावरील दहा टक्के सेवा शुल्क 51 लाख 59 हजार रुपये असे एकूण 8 कोटी 40 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार, संबंधित ठेकेदारांबरोबर तीन महिने कालावधीचा करारनामा करून घेण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.