Chinchwad : शहराची जीवनवाहिनी मृत्यूशय्येवर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला (Chinchwad) दररोज सुमारे 600 एमएलडी पाणी लागते. त्यापैकी 510 एमएलडी पाणी पवना नदीतून तर 100 एमएलडी पाणी भामा आसखेड धरणातून उचलले जाते. पवना नदी ही शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. वाढते नागरीकरण, औद्योगीकरण, प्रदूषण यामुळे पवना नदी सुमारे 17 किलोमीटर पर्यंत मृत झाली आहे. प्रदूषणामुळे पवना नदी सातत्याने फेसाळत आहे. एकेकाळी स्वच्छ वाहणा-या पवना नदीची गटार झाली आहे. शहराची जीवनवाहिनी मृत्यूशय्येवर असून वेळीच उपाय न केल्यास शहर उध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही.

शहरातील पर्यावरण तज्ञ सांगतात, रावेत येथून सन 1989 पासून महापालिकेने पाणी उचलण्यास सुरुवात केली. त्यावेळी किवळे, मामुर्डी आणि नदीकाठच्या भागात लोकवस्ती नव्हती. मागच्या 25 ते 30 वर्षांमध्ये नदीकाठी आणि शहरात सर्वच भागात लोकवस्ती वाढली.

त्यानंतर सोसायट्यांचे पाणी थेट नदीत सोडले जाऊ लागले. असे प्रकार निदर्शनास येऊ लागल्याने पालिकेचा पाणीपुरवठा विभाग, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून तपासणी केली जाऊ लागली. शहरात काही ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्प आहेत, तरीही अशुद्ध पाणी नदीत मिसळले जात आहे.

शिरगाव, गहुंजे, साळूंब्रे दरम्यान अनेक ठिकाणी घाण पाणी नदीत मिसळले जात आहे. तेच पाणी शहराला पुरवले जाते. पाणी शुद्ध करून पुरवले जात असल्याने अद्याप तरी पिण्याच्या पाण्यात घातक घटक आढळत नाहीत, ही त्यातली जमेची बाब आहे. पुढील काळात प्रदूषणाची पातळी वाढेल तशी पाण्याची अवस्था देखील गंभीर होणार आहे. नदीच्या पाण्यात काही रसायने विरघळली जात आहेत.

ती रसायने वेगळी करण्याची यंत्रणा पालिकेकडे नाही. सध्या तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या निकषांमध्ये पवना (Chinchwad) नदीतून उचललेले पाणी बसत आहे. मात्र भविष्याचा विचार करता मागील 15 वर्षात पवना नदी जेवढी प्रदूषित झाली तेवढीच वाढ होण्यासाठी पुढील पाच वर्ष सुद्धा पुरेशी आहेत. प्रत्येक सोसायट्यांना पाण्याबाबत कठोर नियम करणे गरजेचे आहे. पाण्याचा पुनर्वापर, पाणी जागेवर जिरवणे असे उपाय करता येतील. शासन, प्रशासनावर अवलंबून न राहता प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करणे गरजेचे आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख श्रीकांत सवणे सांगतात, “पवना नदीतून महापलिका 510 एमएलडी पाणी उचलते. ते सर्व पाणी नियमानुसार जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाते. पिण्यायोग्य पाणी झाल्यानंतरच त्याचा शहरवासियांना पुरवठा केला जातो.”

प्रदूषित पाण्यामुळे महिलांमध्ये अनेक आजारांची वाढ झाली असल्याचे शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. विश्वास येवले सांगतात. डॉ. येवले म्हणतात, “घरगुती केमिकल्स, डिटर्जंट मिसळून पाणी प्रदूषित झाले असेल तर त्यामुळे महिलांमध्ये पीसीओडी सारखे आजार वाढत आहेत. पाण्यातील नायट्रोजन वाढले तर पित्त आणि पोटाचे विकार सुरु होतात. नायट्रोजनमुळे बेशरम, शेवाळ, हायसीन अशा वनस्पती वाढतात. नॅनो प्लास्टिकमुळे महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे.

पिंपरी-चिंचवड शहर पवना नदीच्या उगमाच्या दिशेने किवळे, मामुर्डी या भागात नदीच्या काठावर विस्तारत आहे. शेतीच्या ठिकाणी मोठमोठ्या इमारती उभारत आहेत. या इमारतींमधील ड्रेनेज थेट नदीत येऊ लागले. त्यामुळे रहिवासी परिसर नदीपासून ठराविक अंतर दूर ठेवणे गरजेचे आहे.

पाण्यात आलेले प्लास्टिक पाण्यात बुडते. प्लास्टिक कुजत नसल्याने नदीच्या तळाशी प्लास्टिकचे आच्छादन होते. यामुळे पाणी जमिनीत झिरपत नाही. नागरिकांच्या सर्व अडचणी नदीच्या निर्मळतेवर अवलंबून आहेत. नदी प्रदूषणामुळे महिलांमध्ये वंध्यत्व, पीसीओडी, पोटाचे विकार, कर्करोग अशा आजारांचा धोका वाढत आहे. तसेच निसर्गाची अन्नसाखळी देखील बिघडत असल्याचे डॉ. येवले म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सह शहर अभियंता आणि पर्यावरण विभाग प्रमुख संजय कुलकर्णी म्हणाले, “नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांचा आम्ही शोध घेत आहोत. टॅंकर, पाईपलाईन मधून पाणी मिसळले तर त्यावर कारवाई करण्यासाठी पालिकेकडून पथके नेमण्यात आली आहेत. निदर्शनास येताच संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. महापालिका हद्दीच्या बाहेर प्रदूषण होत असेल तर त्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई केली जाते.

स्वच्छ पवना नदीसाठी काम करणारे ओंकार गौरीधर म्हणाले, “सन 2000 साली प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषानुसार पवना नदी प्रदूषित नव्हती. त्यावेळी शहराची लोकसंख्या 11 लाख होती. सन 1998 मध्ये शहराला 24 तास पाणी पुरवठा होत होता. त्यानंतर शहराची लोकसंख्या वाढत गेली आणि पाणीपुरवठा 24 तासांवरून कमी होत गेला. सध्या दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. लोकसंख्या वाढली आणि पाण्याचा स्त्रोत तेवढाच राहिला, त्यामुळे ही परिस्थिती झाली आहे. सन 2008 पर्यंत कंपन्यांमधील पाणी थेट नदीत सोडले जात होते. पवना नदीच्या प्रदूषणाला दापोडी येथून सुरुवात झाली.

आता दापोडीपासून उगमाच्या दिशेने तब्बल 17 किलोमीटर अंतरापर्यंत पवना नदी प्रदूषित झाली आहे. शहरीकरण वाढत गेले आणि बांधकामाचा राडारोडा नदीच्या किनारी टाकला गेला. त्यामुळे नदीचे पात्र लहान होत गेले. सोसायट्यांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांना एसटीपी बांधून देणे बंधनकारक आहे. मात्र त्याचा देखभालीचा खर्च अधिक असल्याने ते कालांतराने बंद पडतात. एसटीपी प्रकल्प बंद पडण्याचे प्रमाण सध्या शहरात सुमारे 50 टक्के एवढे आहे.

केवळ उद्योगांना दोष देऊन चालणार नाही. नदी प्रदूषित करण्यात माझा सहभाग नाही, असा विचार प्रत्येकजण करतो. आंघोळीचे पाणी, साबण, टूथ पेस्ट, हार्पिक, शाम्पू, डीटर्जंट, हेयरडाय अशा असंख्य केमिकलयुक्त गोष्टी पाण्यात मिसळून प्रवाहित होतात. घरातून हे पाणी सोसायटीच्या एसटीपी प्लांटमध्ये जाते. जर तो प्लांट सुरु असेल तर त्यावर काही प्रमाणात प्रक्रिया होऊन पाणी पुढे नदीकडे जाते.

घरातून निघालेले 40 टक्के केमिकलयुक्त पाणी नदीत मिसळले जाते. पावसाचे पाणी नदीत सोडण्यासाठी रस्त्याचे काम सुरु असताना रस्त्याच्या खालून पाईपलाईन नदीपर्यंत आणली जाते. त्यातच नागरिकांनी घरातील सांडपाणी सोडून दिले आहे. नागरिकांनी नैसर्गिक साबण, टूथ पेस्ट, शाम्पू, डीटर्जंट वापरण्यास सुरुवात केली पाहिजे. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असा उपाय देखील गौरीधर सांगतात.

जलदिंडीमधून नदी संवर्धनाचे काम करणारे राजीव भावसार म्हणाले, “पवना नदीत शिवणे गाव ते रावेत बंधारा या दरम्यान नदीच्या प्रदूषणाला सुरुवात होते. प्रदूषणाची पातळी वाढल्याने सन 2016 साली पवना नदीत प्रथम जलपर्णी आढळली. शिवणे गाव ते रावेत बंधारा या दरम्यान 29 नाल्यांमधून दुषित पाणी नदीत सोडल्याचे आढळून आले आहे. त्यासाठी जलदिंडीकडून रिव्हर पोलिसिंग ही संकल्पना राबवली जात आहे. महाविद्यालयीन तरुणांचा सहभाग वाढवला जात आहे. विद्यार्थ्यांना नदीत कसे वावरावे याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

नदी स्वच्छतेची जलदिंडी

पवना नदीच्या स्वच्छतेसाठी दरवर्षी पवनेच्या उगमापासून जलदिंडी काढली जाते. केवळ नदी घाटावर स्वच्छता करणे म्हणजे नदीची स्वच्छता नसून प्रत्यक्ष नदीत उतरून तिची अवस्था जाणून घेणे आणि त्यावर उपाय करणे हे जलदिंडीचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

सध्या पवना नदीची गटार अवस्था झाली आहे. शहरापासून 27 किलोमीटर अंतरावर पवना धरणात पवना नदीचे पाणी पिऊ शकतो. पण ही नदी शहरात आल्यानंतर नदीच्या पाण्याला स्पर्शही नकोसा वाटतो. पवना धरणापासून पाच किलोमीटर अंतरापासून नदी अस्वच्छ होण्यास सुरुवात होते. हिरवे पाणी, हिरवे आणि काळे पाणी असा रंग बदलत शहरात येईपर्यंत ही नदी गटारात रुपांतरीत होते.

Chinchwad : शिवतेजनगरमध्ये रंगला ‘स्वर झंकार’

जलदिंडीच्या माध्यमातून पवना नदीचे प्रदूषण करणाऱ्या अनेक घटकांचा शोध घेण्यात आला आहे. 37 किलोमीटरच्या अंतरात 42 पथके तयार करून नदीच्या स्वच्छतेचा जागर केला जात आहे. नदीत प्रदूषित घटक आढळले तर संबंधित ग्रामपंचायतींना सांगून त्यावर कार्यवाही करण्यास सांगितले जाते.

जलदिंडीतून आता रिव्हर पोलिसिंग हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नदीत येणाऱ्या नाल्यांचे ड्रोन मॅपिंग करून मूळ मालकाचा शोध घेणे, नदीत मिसळणाऱ्या पाण्याची प्रत्येक महिन्याला तपासणी करण्याचे काम रिव्हर पोलिसिंग मधून केले जाणार आहे. शहरातील 13 महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 62 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एका टीममध्ये चारजण काम करतील. हे विद्यार्थी नदीच्या पाण्याचे नमुने जमा करून त्याची महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत तपासणी केली जाईल. मानवी जीवनास हानिकारक असलेल्या प्रत्येक घटकाची तपासणी यामध्ये केली जाणार आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून हे काम सुरु होणार आहे.

शहराची ओळख कशामुळे

पिंपरी-चिंचवड शहरात उद्योग मोठ्या प्रमाणात असल्याने पिंपरी-चिंचवड शहराची जगभर ओळख उद्योगनगरी अशीच आहे. मात्र, राज्याच्या अनेक भागांमध्ये मोकळ्या जागा, रस्ते, वीज अशा मुलभूत सुविधा असताना देखील तिथे व्यवसाय जात नाहीत. त्याचे प्रमुख कारण म्हणजे तिथे पाणी नाही. पिंपरी-चिंचवड शहरात पाणी असल्याने इथे उद्योग वाढले आहेत. नदी प्रदूषित होऊन मृत झाल्यास उद्योग देखील जातील. त्यामुळे इथे पाणी आहे म्हणून उद्योग आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. पाणी नसल्यास इथल्या शिक्षण संस्था, देशभरातून आलेले कामगार देखील शहर सोडून जातील. शहर भकास होईल.

जनसहभाग महत्वाचा

निसर्गाचे संगोपन करणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे म्हणून प्रत्येकजण जबाबदारी झटकतो. आपली सुरक्षा ही देखील शासनाची जबाबदारी आहे तरीही माणूस आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेतोच. तशीच काळजी त्याने निसर्गाचीही घ्यायला हवी.

पाण्याची बाटली विकत घेतली तर शेवटच्या घोटापर्यंत ती आपण सांभाळून ठेवतो. पण हेच घरात होत नाही. एक घोट पाण्यासाठी संपूर्ण ग्लासभर पाणी वाया घालवणारे महाभाग आपल्यातच आहेत. नदीची स्वच्छता ही समाजसेवा राहिलेली नाही. तर ते प्रत्येकाचे कर्तव्य बनले आहे. 20 – 25 वर्षांपूर्वी नदी, तलाव अशा नैसर्गिक स्त्रोतांमध्ये पोहण्याचा आनंद घेतला जात होता. पण आता स्विमिंग पूलवर जावे लागते. नैसर्गिक स्त्रोत मृत होत असल्याचे हे उदाहरण आहे. भविष्यात स्विमिंग पूलसाठी देखील पाणी उरणार नाही. हे भीषण वास्तव समजून घेतले पाहिजे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.