Chinchwad News : शहरात ख्रिश्चन बांधवांनी साजरा केला ‘पाम संडे’

एमपीसी न्यूज – ईस्टर संडेच्या पूर्वीचा रविवार पाम संडे म्हणजेच झावळ्यांचा रविवार म्हणून साजरा केला जातो. हा ख्रिश्चन सण आहे. पिंपरी चिंचवड शहरातील ख्रिश्चन बांधवांनी झावळ्यांचा रविवार आज (दि. 10) मिरवणूक काढून साजरा केला.

जेरुसलेम शहरात येशूचे आगमन आणि त्यानंतरची मेजवानी तसेच येशूचे बलिदान या सर्वांची सुरुवात पाम संडेपासून होते. पुढील रविवारी (दि. 17) ईस्टर संडे साजरा केला जातो. ख्रिश्चन बांधवांनी हातात नारळाच्या झावळ्या घेऊन शांतता फेरी काढली.

पाम संडे ते ईस्टर संडे या आठवडाभराच्या कालावधीत ख्रिश्चन बांधवांकडून विविध कार्यक्रम, उपक्रम राबवले जातात. चर्चमध्ये जाऊन सर्वजण दररोज प्रार्थना करतात. येशूने गाढवाच्या शिंगरावर बसून जेरुसलेम शहरात प्रवेश केला. यहुदी लोकांचे कर्मकांड, धार्मिक प्रथा आणि रितीरिवाजात त्रस्त झालेल्या लोकांनी येशूचे जेरुसलेम शहरात खजुराच्या झाडाच्या झावळ्या पसरून स्वागत केले. त्यामुळे या झावळ्या घेऊन पाम संडे साजरा केला जातो. भारतात खजुराची झाडे नसल्याने नारळाच्या झावळ्या घेऊन फेरी काढली जाते.

पाम संडे, अंजीराचा सोमवार, मौदी गुरुवार, गुड फ्रायडे, ईस्टर संडे असा हा सप्ताह साजरा केला जातो. पाम संडेनिमित्त काढलेल्या फेरीमध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.