Pimpri News : मुदत संपत आली असताना नगरसेवकांचे अभ्यास दौरे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाल 12 मार्च 2022 रोजी संपुष्टात येत असून शेवटच्या तीन महिन्यासाठी नगरसेवक अभ्यास दौ-यावर जाणार आहेत. कोरोनाच्या ओमायक्रॉन या विषाणूचे संकट असतानाही स्थायी समिती, क्रीडा, शहर सुधारणा समिती, ‘फ’ प्रभाग समितीचे सदस्य दौ-यावर जाणार आहेत. इंदूर, पंजाब, हरियानाच्या दौ-याकरिता येणा-या खर्चाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे. निवडणूक नियोजित वेळेस झाल्यास जानेवारी महिन्यात आचारसंहिता लागू शकते. ओमायक्रॉन आणि ओबीसी आरक्षणामुळे निवडणूक पुढे जाईल अशी चर्चा आहे. निवडणूक पुढे गेली तरी विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाल 12 मार्च 2022 पर्यंत आहे. नगरसेवकपदाचा कार्यकाल अडीच-तीन महिन्यांचा राहिला असताना नगरसेवकांना अभ्यास दौ-यावर जायचे आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आठ क्षेत्रीय कार्यालये आहेत. प्रत्येक कार्यालयाच्या हद्दीत 16 नगरसेवक येतात. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत निगडीतील ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयातील 16 नगरसेवक आणि तीन अधिकारी इंदूरच्या अभ्यास दौ-यावर जाणार आहेत. स्वच्छ भारत अभियानात इंदूरचा देशात पहिला क्रमांक आला आहे. इंदूर दौ-यावर जाण्यासाठी फ प्रभाग समितीच्या नोव्हेंबर 2021 च्या मासिक सभेत मान्यता दिली. या अभ्यास दौ-यास आणि त्यासाठी येणा-या प्रत्यक्ष खर्चाच्या सदस्य प्रस्तावाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

क्रीडा विषयक अभ्यास करण्याकरिता पंजाबच्या जालंधर पटियाला, स्पोर्ट अॅथोरीटी ऑफ इंडिया हरियाणा या ठिकाणी स्थायी समिती व क्रीडा समिती सदस्यांचा जानेवारी 2022 मध्ये पहिल्या आठवड्यात अभ्यास दौरा आयोजित केला आहे. या अभ्यास दौ-यास येणा-या खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

तसेच पिंपरी-चिंचवड शहराचा विकास व नागरिकांच्या सुविधाकरता इंदूर या विकसनशील शहराची पाहणी करण्यात येत आहे. यामध्ये शहर सुधारणा समिती सदस्यांसह अन्य इच्छुक सदस्यांचा व अधिका-यांचा दौरा आयोजित केला आहे. त्यासाठी येणा-या प्रत्यक्ष खर्चास स्थायीने मान्यता दिली. या पंचवार्षिकमधील कार्यकाल संपत असताना अभ्यास दौ-यावर चाललेल्या नगरसेवकांचा शहराला फायदा होणार की नगरसेवकांची सहल होणार असा प्रश्न आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.