Omicron News : पिंपरी -चिंचवडमध्ये एकाच दिवशी ‘ओमायक्रॉन’चे 7 नवीन रुग्ण

पुणे जिल्ह्यात 'ओमायक्रॉन'चे आज नवे 13 रुग्ण ; पुण्यात 3, पुणे ग्रामिण येथे 3, तर पिंपरी - चिंचवड मध्ये 7 रुग्ण

एमपीसी न्यूज – कोरोनाचा नवीन विषाणू असलेल्या ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग झालेले 7 नवीन रुग्ण आज (गुरुवारी) पिंपरी-चिंचवड शहरात सापडले आहेत. त्यामध्ये 4 पुरुष, 2 महिला आणि 1 लहान मुलीचा समावेश आहे. 4 रुग्ण महापालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालयात तर 3 रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नेदरलँड, साऊथ आफ्रिकेवरून आलेले हे रुग्ण असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. आजपर्यंत शहरातील 18 आणि बाहेरील 1 अशा 19 रुग्णांची नोंद झाली आहे.

आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. केंद्र व राज्य शासनाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सूचित केले आहे. त्यानुसार महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या अनुषंगाने महापालिकेतर्फे तपासणी मोहीम सुरू आहे. सद्यस्थितीत शहरात ओमायक्रॉनचे दोन सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी एक रुग्ण शहराबाहेरील असून शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.

आतापर्यंत शहरातील 18 आणि बाहेरचा 1 असे ओमायक्रॉनचे 19 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये परदेशातून आलेल्या 10 जणांचा समावेश आहे, तर शहरातील त्यांच्या संपर्कातील 9 जणांचा समावेश आहे. यापैकी 10 रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या 9 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज पॉझिटिव्ह आलेले 2 रुग्ण नेदरलँडवरून, 1 रुग्ण साऊथ आफ्रिकेवरून शहरात आले होते. तर, त्यांच्या संपर्कातील 1 रुग्ण आणि दुसऱ्या देशातून आलेले 3 रुग्ण आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.