Corona Vaccine News: कोव्हिशिल्ड लस पूर्णत: सुरक्षित, सीरम इन्स्टिट्यूटचा पुनरुच्चार

एमपीसी न्यूज : चेन्नईमधील एका स्वयंसेवकाने कोरोनावर तयार करण्यात येत असलेल्या कोव्हिशिल्ड लसीबद्दल धक्कादायक आरोप केले होते. लसीवर स्वयंसेवकाने आरोप केल्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पण सीरम इन्स्टिट्यूटने चेन्नईतील स्वयंसेवकाने केलेले आरोप फेटाळून लावत ‘कोव्हिशिल्ड लस पूर्णत: सुरक्षित असल्याचा पुनरुच्चार सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केला.

न्यूरॉलॉजिकल ब्रेकडाऊन आणि विचार करण्याची क्षमता कमी झाल्याचा आरोप करत सीरम इन्स्टीट्यूट आणि अन्य काही जणांना कोव्हिशिल्डची लस घेतलेल्या चेन्नईतील एका स्वयंसेवकाने कायदेशीर नोटीस पाठवली होती. तसेच पाच कोटी रूपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती. त्याचबरोबर लसीची चाचणीही थांबवण्यात यावी, अशी मागणी केली होती. पण सीरमने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

कोव्हिशिल्ड लस सुरक्षित व रोगप्रतिकारक असून चेन्नईच्या स्वयंसेवकांसोबत झालेली घटना दुर्दैवी आहे, पण कोव्हिशिल्ड लसीमुळे ही घटना घडलेली नाही. सीरम इन्स्टिट्यूटनेही स्वयंसेवकासोबत झालेल्या प्रकारानंतर सहानूभूती व्यक्त केली आहे. सर्व नियम, मार्गदर्शक सूचना व प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करण्यात आलेल्याचे सीरम इन्स्टिट्यूटने म्हटले आहे.

सीरमला पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये करण्यात आलेले आरोप हे अत्यंत चुकीचे आणि दुर्देवी असून सीरम इन्स्टिट्यूटला त्यांच्या स्वयंसेवकांच्या वैद्यकीय स्थितीबाबत काळजी आहे. लसीची चाचणी स्वयंसेवकाची वैद्यकीय स्थिती यांचा अजिबात संबंध नसल्याचे स्पष्टीकरण सीरम इन्स्टिट्यूटकडून देण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.