D. M. Mirasdar Passes Away : विनोदी लेखक व कथाकथनकार द. मा. मिरासदार यांचे निधन

एमपीसी न्यूज – मराठीतील नामवंत विनोदी लेखक व कथाकथनकार दत्ताराम मारुती मिरासदार (94) यांचे आज (शनिवारी) वृद्धापकाळानं निधन झाले आहे. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. द. मा. मिरासदार यांचा 14 एप्रिल, 1927 मध्ये जन्म झाला होता.

मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि त्याचे उत्तम सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे 24 कथासंग्रह, 18 विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत.

द. मा. मिरासदार यांना साहित्य अकादमी पुरस्काराबरोबरच महाराष्ट्र राज्याचा वाङ्मयीन पुरस्कारही मिळाला होता. त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.

मिरासदार यांचे शिक्षण अकलूज, पंढरपूर येथे झाले होते. पुण्यात आल्यावर ते एम्‌.ए. झाले. काही वर्षे पत्रकारिता केल्यानंतर त्यांनी 1952 साली अध्यापनक्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कॅंप एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. 1961 मध्ये ते मराठीचे प्राध्यापक झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.