Dehu : विठुनामाच्या गजरात तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान

एमपीसी न्यूज – धन्य दिवस अजि दर्शन संतांचे, नांदे तया घरी दैवत पंढरीचे… या अभंगाचे स्मरण… टाळ मृदुंगाचा निनाद…. तुकोबा-तुकोबा नामाचा अखंड गजर… अन् मनी विठुरायाच्या भेटीची आस… अशा अत्यंत भक्तिरसपूर्ण वातावरणात संतशिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीने सोमवारी (दि. २४) दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी देहहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.

कपाळावर बुक्का, गळय़ात तुळशीच्या माळा, हातात टाळ, खांद्यावर पताका, मुखी विठ्ठलनामाचा जप अन् मनी सावळय़ा विठ्ठलाच्या भेटीची आंतरिक ओढ ठेऊन श्रीक्षेत्र देहूत वैष्णवांची मांदीयाळी पवित्र इंद्रायणीकाठी एकवटलेली. त्यांच्या साक्षीनेच पालखी पंढरीच्या वाटेकडे मार्गस्थ झाली. तुकोबारायांचा आत्मिक लळा अन् पांडुरंग भेटीची आस लागलेल्या वारकऱयांनी भक्तिसागरात चिंब होत विठुरायाकडे सुखसमृद्धी आणि पावसाचे मागणे मागितले.

  • आषाढवारीच्या या 334 व्या भक्तीप्रवाहात भाविक सहभागी झाले आहेत. पहाटे घंटानादाने अवघा गाव जागा झाला. तेव्हापासूनच इंद्रायणीच्या डोहात आनंदाचे तरंग उमटत होते. परंपरेनुसार प्रस्थान सोहळय़ास पहाटे पाच वाजता प्रारंभ झाला. संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा झाली. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची महापूजा पारंपरिक दिंडीच्या मानकऱयांच्या हस्ते झाली.

पहाटे साडेपाच वाजता वैकुंठस्थान मंदिरात श्री तुकाराम महाराजांची तसेच पालखी सोहळय़ाचे जनक श्री नारायणमहाराज समाधीची महापूजा करण्यात आली. सकाळी दहा वाजता रामदास देहूकर यांचे कार्ल्याचे कीर्तन झाले. तुकोबांच्या आजोळघरी इनामदार वाडय़ात पाद्यपूजा, गणेशपूजा, वरुणपूजा आणि कलशपूजा करण्यात आली.

  • इनामदार वाडय़ात कारभारी आणि वारक-यांच्या हस्ते पादुकापूजन झाले. परंपरेनुसार पादुका म्हसलेकर मंडळींच्या ताब्यात देण्यात आल्या. वारकऱयांनी त्या वाजतगाजत मुख्य मंदिरातील भजनी मंडपात आणल्या. यावेळी पालखी प्रस्थान प्रमुथ संजय मोरे, काशीनाथ मोरे, अजित मोरे, मधुककर भिकाजी गोरे व विश्वस्त मंडळ आदी उपस्थित होते. पालखीमध्ये एकूण 329 दिंड्या होत्या.

दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी पालखी प्रस्थान सोहळय़ास प्रारंभ झाला. रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या पालखीतील पादुकांची पूजा करण्यात आली. यावेळी पर्यावरण व कामगार मंत्री बाळा भेगडे, खासदार श्रीरंग बारणे. उपजिल्हाधइकारी सचिन बारवकर, तहसिलदार गीता गायकवाड, डॉ. सदानंद मोरे, जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार, ‘पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम’ आणि ’ज्ञानोबा-तुकोबा’चा जयघोष करीत देहूगावातील वारकऱयांनी तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेवत पालखी खांद्यावर घेतली. यावेळी शंख, नगारा, ताशांचा गजर झाला.

  • भजनी मंडपातून पालखी बाहेर येताच दिंडय़ांमध्ये उत्साह संचारला. वीणा झंकारल्या, मृदंगाचा स्वर टिपेला पोहोचला, वारकऱयांची पावले थिरकली. ऊन- सावल्यांच्या खेळात फुगडय़ा रंगल्या. निसर्गानेही यात रंग भरले. आभाळात जणू मेघनृत्य पाहायला मिळाले.

वारकऱयांच्या डोळय़ात, मनातच नव्हे तर अवघ्या आसमंतात जणू विठ्ठल भरून राहिला. चांदीची अब्दागिरी, छत्रचामर, गरुडटक्के, पुण्याचे बाभूळगावकर यांचा मानाचा अश्व आणि अकलूजचे प्रतापसिंह मोहिते- पाटील यांचा अश्व अशा थाटात पालखीची देऊळवाडय़ाभोवती प्रदक्षिणा सुरु झाली. सायंकाळी साडेचार वाजता मोठय़ा भक्तिमय वातावरणात पालखी मुख्य मंदिराबाहेर पडली. सायंकाळी देहू परिसरात पाऊसही झाला.

  • पावसासाठी देवाकडे साकडे – रोहित पवार (जिल्हा परिषद सदस्य)

वारीमध्ये असलेले भक्तीमय वातावरण अनुभवण्यासाठी आलो आहे. देहूमध्ये येण्याची वेळ पहिलीच आहे. भेदभाव विसरुन एकत्र येणा-या वारक-यांकडून खूप शिकण्यासारखे आहे. राज्यात भरपूर पाऊस पडू दे. यासाठी देवाकडे साकडे मागितले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य रोहीत पवार यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.