Dehuroad : कच-याच्या गाडीत टाकले मृत अर्भक ; हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचा गलथानपणा

एमपीसी न्यूज – देहूरोड कन्टोनमेंट बोर्डाच्या कचरा गाडीत मृत अर्भक आढळून आले. या अर्भकाचे वय किमान 16 आठवडे आहे. प्रसूतीवेळी मृत जन्मलेल्या अर्भकाची योग्यप्रकारे विल्हेवाट न लावता कचरा गाडीत टाकल्याने त्याचा मानवी जीवनास संसर्ग होण्याची शक्यता आहे. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात हॉस्पिटलच्या संचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. यामिनी अद्वैत आडवे (वय 55, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर छावणी परिषद हॉस्पिटल, देहूरोड) यांनी या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जीवन रेखा हॉस्पिटलच्या संचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. यामिनी अद्वैत आडवे डॉ. बाबासाहेब आंबेडकर छावणी परिषद हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांना जीवन रेखा हॉस्पिटल येथे कचऱ्याच्या गाडीत मृत अर्भक असल्याचे आढळले. अर्भकाचे वय सुमारे 16 आठवडे आहे.

या अर्भकाबाबत त्यांनी चौकशी केली असता, बुधवारी (दि 26) देहूगाव येथील वीस वर्षीय महिलेच्या प्रसूतीदरम्यान मृत अर्भक जन्मल्याचे समजले. मात्र आरोग्य विभागाची बुधवारी गाडी न आल्याने त्या अर्भकाची विल्हेवाट लावता आली नाही. म्हणून जीवन रेखा हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (दि 27) मृत अर्भकास कचऱ्याच्या गाडीत दिले. मृत अर्भकाची अशा प्रकारे विल्हेवाट लावल्यामुळे त्याचा संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. यामुळे मानवी जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.