Dehuroad: अवैध धंदेवाल्यांपुढे पोलिसांनी झुकू नये – सुनील शेळके

एमपीसी न्यूज – अवैध धंदे करणाऱ्यांपुढे पोलीस नेहमी झुकताना दिसतात. हा प्रकार अयोग्य असून पोलिसांनी त्यांच्या कृतीतून विश्वासार्हता जपावी, असा टोला मावळचे आमदार सुनील शेळके यांनी लगावला.
देहूरोड परिसरातील गांधीनगर, शिवाजीनगर, राजीव गांधीनगर येथे सुरू असलेले अवैध धंदे त्वरीत बंद करावेत. हे धंदे चालविणाऱ्यांवर कडक शासन करावे, या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षातर्फे स्वामी विवेकानंद चौकात रविवारी उपोषण करण्यात आले. आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते जलप्राशन करून आंदोलकांनी उपोषण मागे घेतले. त्यावेळी शेळके बोलत होते.

आपल्या कार्यक्षेत्रात कोणावरही अन्याय होणार नाही, हे पाहण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. पोलिसांनी ती समर्थपणे पार पाडली पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. बहतांश वेळ कायद्याला आपल्या पध्दतीने वळण देऊन नागरिकांना त्रास देण्याचे काम केले जाते. या उलट अवैध व्यवसाय करणाऱ्यांपुढे पोलीस नेहमी झुकताना दिसतात. हा प्रकार अयोग्य असून पोलिसांना आपली विश्‍वासार्हता जपली पाहिजे, अशी अपेक्षा शेळके म्हणाले.

 

पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या महिला सरचिटणीस गौसिया शेख, विमेन हेल्पलाईनच्या संस्थापक अध्यक्ष नीता परदेशी, तहेसीन शेख यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आले. गहुंजे ग्रामपंचायत सदस्य वंदना तरस, राणी सिंग, संगीता वाघमारे यांच्यासह आंदोलनाला पिंपरी-चिंचवड परिसर तसेच देहरोड, साईनगर भागातून मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
अवैध धंद्यांमुळे अनेक संसार उध्वस्त होतात. त्याची सर्वात जास्त झळ महिलांना बसते. त्यामुळे विमेन हेल्पलाईनचा अवैध धंद्यांना तीव्र विरोध असून पोलिसांनी त्याबाबत कडक भूमिका घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करावे लागेल, असा इशारा नीता परदेशी यांनी दिला.
पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष रामदास ताटे, काँग्रेसचे दीपक चौगुले, संदीप बहोत, नदीम शेख, गफुरभाई शेख, गंगुताई खळेकर, गौसिया शेख आदींची यावेळी भाषणे झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.