Dehuroad News : महापालिकेने कॅंटोन्मेंट हद्दीत रस्ते आणि गटारींची कामे करावीत- रघुवीर शेलार

महापौर माई ढोरे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

एमपीसी न्यूज : देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाकडे निधीची कमतरता असल्याने स्थानिक जनतेला सोयी सुविधा पुरविण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेलगत कॅंटोन्मेंट हद्दीला जोडणाऱ्या रस्ते व गटरी दुरूस्ती करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी आमदार लक्ष्मण जगताप आणि महापौर माई ढोरे यांच्याकडे केली आहे.

याबाबत शेलार यांनी आमदार जगताप आणि महापौर ढोरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी भाजपाचे देहूरोड शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार, शंकराव शेलार नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक अमित भेगडे व उद्योजक शाम मोहिते उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत विकासनगर- किवळे, गहुंजे, मामुर्डी आदी गावे आहेत. या गावांना लागूनच देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाची हद्द आहे. बोर्डाच्या हद्दीत समाविष्ट असणा-या भागातील जनतेला महापालिका आणि कॅंटोन्मेंट हद्दीतून ये-जा करावी लागते.

केंद्र सरकारने देशात सर्वत्र जीएसटी कर प्रणाली लागू केल्यामुळे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या
जकातीच्या उत्पन्नाचा मुख्या स्त्रोत बंद झाला. त्याच प्रमाणे केंद्र अथवा राज्य शासनाकडून कॅंटोन्मेंट बोर्डास जीएसटी  पोटी कुठलेही अनुदान आजपावेतो मिळालेले नाही. त्यामुळे कॅंटोन्मेंट बोर्डाची आर्थिक परिस्थिती  हलाखीची झाली आहे.

सध्या कॅंटोन्मेंट बोर्डाला दैनंदिन खर्च पुरविणे कठीण झाले आहे. त्याचप्रमाणे निधी अभावी अनेक विकास कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे  कॅंटोन्मेंट बोर्ड आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीला लागून असलेल्या भागात महापालिका प्रशासनाने विकासकामे करावीत, अशी मागणी रघुवीर शेलार यांनी निवेदनात केली आहे.

यामध्ये प्रामुख्याने स्वामी विवेकानंद चौक देहूरोड ते गहुंजे हद्द (शितळानगर मामुर्डी मार्गे) या रस्त्याचे डांबरी, पथ दिवे दुरूस्ती व गटर दुरूस्ती,  शिवछत्रपती शिवाजी चौक सेंट्रल रेस्टोरंट ते (लायन्स क्लब शाळा मार्गे) शितळानगर चौक या रस्त्याचे डांबरीकरण, थॉमस कॉलनी आबिद हेअर कटींग सलून ते (थॉमस यांच्या घरामार्गे) बालिका आश्रम या रस्त्याचे डांबरीकरण, गटर दुरूस्ती व पथ दिवे दुरूस्ती, थॉमस कॉलनी आबिद हेअर कटींग सलून ते कुदंबिनी हौसींग सोसायटी व संजय राउत यांच्या घरामार्गे ते बालिका आश्रम या रस्त्याचे डांबरीकरण, गटर दुरूस्ती व पथ दिवे दुरूस्ती करावी, अशी मागणी शेलार यांनी महापौर ढोरे यांच्याकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.