Dehuroad News : डांबरात फसलेल्या दोन धूळनागीण वन्यजीव रक्षकांच्या मदतीने निसर्गाच्या सानिध्यात सळसळल्या

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या कामासाठी आणलेल्या डांबरामध्ये अडकलेल्या दोन धूळनागिणींना वन्यजीव मावळ या संस्थेच्या सदस्यांनी जीवनदान दिले. नागिणींच्या शरीरावरील डांबर काढण्याची प्रकिया तब्बल तीन तास चालली. स्वयंसेवकांच्या मदतीमुळे पूर्णतः डांबरमुक्त झालेल्या दोन्ही नागिण घोरावडेश्वर डोंगराच्या नैसर्गिक अधिवासात सळसळल्या.

शनिवारी दुपारी साडेचार वाजता वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अध्यक्ष निलेश गराडे यांना एका महिलेने फोन करून माहिती दिली की, बारलोटा नगर, देहूरोड येथे डांबरामध्ये दोन साप अडकले आहेत. त्यातून बाहेर येण्यासाठी ते जीवाचा आकांत करीत आहेत. अध्यक्ष गराडे यांनी सदस्य आशिष चांदेकर, विशाल बोडके, रितेश साठे आणि निखिल कुंभार यांना बारलोटा नगर येथे पाठवले.

धूळ नागीण जातीचे दोन सर्प डांबरात अडकले असल्याचे सदस्यांच्या निदर्शनास आले. बारलोटा नगर येथे रस्त्याची कामे सुरु असून त्या कामासाठी ठेकेदारांनी डांबर आणून ठेवले आहे. धूळ नागीण डांबरातून जात असताना त्यात त्या अडकल्या. संपूर्ण शरीराला डांबर लागले असल्याने त्यांना जमिनीवर सरपटणे कठीण झाले. त्या केवळ हालचाल करू शकत होत्या.

सदस्यांनी दोन्ही नागीण एका कापडावर घेतल्या. त्यानंतर त्यांच्या शरीराला चिकटलेले डांबर काढले. दरम्यान त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही, याची काटेकोर काळजी घेतली. त्यांच्या शरीरात डांबर गेले असते तर त्यांचा मृत्यू देखील झाला असता. मात्र वेळीच उपाय सुरु झाल्याने तो धोका टळला. चार सदस्य दोन नागिणीच्या अंगावरील डांबर तब्बल तीन तास काळजीपूर्वक काढत होते.

तीन तासानंतर त्यांना जणू पुनर्जन्म देण्यात या सदस्यांना यश आले. वन्यजीव संस्थेच्या सदस्यांनी दोन्ही नागिणींना देहूरोड येथील घोरावडेश्वर डोंगराच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. मानवी काँक्रीटच्या जंगलात येऊन डांबरात अडकलेल्या दोन्ही नागीण पुन्हा नैसर्गिक अधिवासात जाताच आपल्या चपळाईने सळसळल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.