Nigdi : प्राधिकरणातील देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाग निगडी पोलीस ठाण्यास जोडावा

नगरसेवक अमित गावडे यांची पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

एमपीसी न्यूज – प्राधिकरण सेक्टर २६ मधील जो भाग देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. तो भाग निगडी पोलीस ठाण्यास जोडावा. त्यामुळे नागरिकांना पोलीस ठाण्याशी संपर्क करणे, पोलीस मदत मागणे सोयीस्कर होईल, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक अमित गावडे यांनी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्याकडे केली.

अमित गावडे यांनी याबाबत पोलीस आयुक्तांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, निगडी प्राधिकरण सेक्टर 26 मधील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट कॉलेजच्या जवळील आणि मूक बधिर कॉलेजच्या मागील भाग सध्या रावेत पोलीस चौकी अंतर्गत देहूरोड पोलीस ठाण्याला जोडण्यात आला आहे. या भागात सुमारे दहा हजार लोकवस्ती आहे. या लोकवस्तीपासून रावेत पोलीस चौकी सुमारे चार किलोमीटर लांब आहे. तर देहूरोड पोलीस ठाणे सुमारे सहा किलोमीटर दूर आहे. यामुळे नागरिकांना पासपोर्ट आणि अन्य कारणांसाठी पोलीस ठाण्यात जाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

प्राधिकरण मधील सेक्टर 26 मधील नागरिकांना आकुर्डी पोलीस चौकी अवघ्या एक आणि निगडी पोलीस ठाणे सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे. हा भाग निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणल्यास नागरिकांसाठी सोयीचे होईल. तसेच पोलिसांना देखील प्रशासकीय दृष्ट्या या भागावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु होताना पुणे ग्रामीणमधून देहूरोड पोलीस ठाणे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आले. त्यानंतर सेक्टर 26 मधील काही भाग देहूरोड पोलीस ठाण्यात येत होता. या भागातील नागरिकांना देहूरोड पोलीस ठाणे दूर पडत असल्याचे यापूर्वी आपल्या निदर्शनास आणून दिले होते. देहूरोड पोलीस ठाण्यांतर्गत रावेत पोलीस चौकी नव्याने सुरु करण्यात आली आहे. या चौकीला सेक्टर 26 मधील काही भाग जोडण्यात आला आहे.

सेक्टर 26 मधील देहूरोड पोलीस ठाण्यात समाविष्ट करण्यात आलेला भाग आकुर्डी पोलीस चौकीअंतर्गत निगडी पोलीस ठाण्यास जोडल्यास नागरिकांना सोयीचे होईल. सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी हा बदल आपण करावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.