IPL 2021: दमदार विजय मिळवत दिल्ली कॅपिटल्सने आपले स्थान केले आणखी बळकट

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर झालेल्या आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने अचूक गोलंदाजी करत माफक आव्हानही राखले आणि 33 धावांच्या 20/20 मधल्या मोठ्या विजयासह एकूण 16 पॉईंट्स मिळवत नंबर 1 वर विराजमान होण्याचा सन्मानही मिळवला. अर्थात आता अंतिम चरणाकडे स्पर्धा चालली असल्याने नंबर 1 कधी याच्याकडे कधी त्याच्याकडे असे होतच राहील.

आयपीएलच्या अंतीम टप्प्यासाठी चाललेल्या लढतीत राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या आजच्या सामन्यात संजू सॅमसन विरुद्ध ऋषभ पंत या दोन युवा यष्टीरक्षक कर्णधार यांच्यामध्ये संजू सॅमसनने आज नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्विकारली. आणि त्याच्या गोलंदाजानी कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवत उत्तम कामगिरी केली.

आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा शिखर धवन आणि आक्रमक पृथ्वी शॉ काहीही खास करू शकले नाहीत.कार्तिक त्यागीच्या चेंडूला कट करण्याच्या नादात धवनने तो चेंडु यष्टीवर ओढवून घेतला आणि केवळ 8 धावा करून तो चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला,पाठोपाठ पृथ्वीही साकरीयाचा बळी ठरला, त्याने लिव्हिंगवुडकडे झेल दिला, त्याने बारा चेंडूत केवळ दहा धावा केल्या.

या खेळीत ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर या आजीमाजी कर्णधारामध्ये 7 षटकात 62 धावांची चांगली भागीदारी झाली आणि दिल्लीचा डाव सावरतोय असे वाटत असतानाच आधी पंत 24 आणि नंतर केवळ सात धावा जोडून अय्यरही वैयक्तिक 43 धावांवर बाद झाला आणि दिल्लीसंघ चांगलाच अडचणीत आला.

हेटमायर आणि अक्षर पटेलने थोडा फार प्रतिकार करत संघाला कसेबसे 150 च्या पुढे नेले खरे पण आपल्या निर्धारित 20 षटकात दिल्ली कॅपिटल्सला केवळ 154 धावांवरच समाधान मानावे लागले. राजस्थान रॉयल्सच्या सर्वच गोलंदाजांनी किफायतशीर गोलंदाजी करत दिल्लीला रोखले. मुस्तफिजुर व साकरियाने प्रत्येकी दोन दोन बळी घेतले,तर तेवटीया व कार्तिक त्यागीने एकेक बळी मिळवला.

मागच्या सामन्यात अंतिम षटकात उत्तम गोलंदाजी करून सामनावीर ठरलेला त्यागी आज मात्र सर्वात महागडा गोलंदाज ठरला. दिल्ली कडून श्रेयस अय्यर सर्वात जास्त धावा करणारा ठरला,पण त्याला म्हणावी तशी साथ दुसऱ्या बाजूने न मिळाल्याने चांगल्या स्थितीत असलेल्या दिल्ली संघाला केवळ 154 धावाच करता आल्या.

उत्तरादाखल खेळताना राजस्थान रॉयल्सची सुद्धा सुरुवात खराबच झाली,पहिल्याच षटकाच्या अंतिम तर दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर दोन्हीही सलामीवीर स्वस्तात बाद झाले. लिविंगवुडला एकाच धावेवर आवेश खान तर जैस्वालला केवळ 5 धावा असताना नोर्जेने बाद करत दोन बाद सहा अशी अवस्था केली. यातून सावरणार तोच अश्विनने डेविड मिलरला पंतद्वारे वैयक्तिक केवळ सात धावांवर यष्टीमागे झेलबाद करून तिसरा मोठ्ठा धक्का दिला.

तीन बाद सतरा अशी अवस्था झाल्यावर साहजिकच राजस्थान रॉयल्सपुढे पराभवाचा खतरा दिसत होता आणि संजू सॅमसनला साथ देण्यासाठी आधीच्या सामन्यातल्या प्रभावी कामगिरीने लक्ष वेधून घेणारा महिपाल लोमरार आला,त्याने बऱ्यापैकी आशा दाखवली पण तो ही संघाची धावसंख्या 48 असताना रबाडाच्या गोलंदाजीवर आवेश खानकडे झेल देवून वैयक्तिक 19 धावांवर बाद झालाआणि त्याच्या पाठोपाठ रियान पराग सुद्धा अक्षर पटेलची शिकार झाला. त्याने केवळ दोनच धावा काढल्या.

माजी सलामीवीर रॉबिन उत्तपाला त्याच्यामध्ये धोनीची झलक दिसते म्हणे पण इतक्या आयपीएलमध्ये तरी प्रेक्षकांना आणि समीक्षकांना मात्र ती झलक काही दिसलेली नाही. सात षटकांत 97 धावांचे विजयी लक्ष कधीच सोपे नसते पण 20/20 मध्ये कधीही काहीही होऊ शकते असे म्हणतात,राजस्थान रॉयल्सच्या समर्थकाना तशी अपेक्षा असणे काही गैर नव्हते त्यातच कर्णधार संजू सॅमसन अद्याप मैदानावर खेळत होता.त्यामुळे काहीतरी चमत्कार होईल अशी आशा त्यांना होतीच.

संजू सॅमसन मध्ये नक्कीच सामना एकहाती फिरवायची क्षमता आहे, एक दोन महागडे षटक सामन्याचा निकाल बदलवून टाकतात आणि आतापर्यंत बऱ्याचदा असे घडलेलेही आहे त्यामुळे राजस्थान रॉयल्सला आशा होतीच. मात्र अशक्य ते शक्य करण्यात संजू समर्थ ठरला नाही. बघताबघता त्याच्या आवाक्याच्या बाहेर हे आव्हान होत गेले आणि दिल्लीच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत राजस्थान रॉयल्सचा 33 धावांनी पराभव केला.

संजू सॅमसनने आज कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी केली असली तरी ती सामना जिंकून देवू शकली नाही.संघाच्या 121 धावांपैकी नाबाद 70 धावां त्याने केल्या पण दुसऱ्या बाजूने त्याला जराही साथ न मिळाल्याने त्याची ही खेळी वांझोटीच ठरली. या पराभावाने राजस्थान रॉयल्सच्या पुढे काय काय संकटे वाढून ठेवली आहेत हे येत्या काही दिवसांतच समजेल ,नाही का?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.