Maval News : निगडी – किल्ले तिकोनागड बस सुरू करण्याची मागणी

गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेचे पीएमपीएमएल प्रशासनाला मागणीचे निवेदन

एमपीसी न्यूज – पवन मावळातील नागरिकांना पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराशी जोडणारी सशक्त सार्वजनिक वाहतूक सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होते तसेच पवन मावळ परिसरात पर्यटनासाठी जाणा-या पर्यटकांमध्ये देखील नाराजी होते. त्यामुळे निगडी – पवनानगर – किल्ले तिकोनागड या मार्गावर पीएमपीएमएल बस सेवा सुरु करावी, अशी मागणी गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेच्या वतीने किरण चिमटे यांनी दिली.

गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्या वतीने पीएमपीएमएल प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. पवन मावळ परिसरात तिकोनागड, बेडसे लेणी, पवना धरण, वाघेश्वर मंदिर अशी ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटन केंद्र आहेत. या ठिकाणी पुणे, पिंपरी चिंचवड तसेच राज्याच्या विविध भागातील पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात. पवन मावळ परिसराची बाजारपेठ आणि प्रशासकीय कार्यालये कामशेत आणि वडगाव मावळ येथे आहेत. वडगाव आणि कामशेत येथे येण्या-जाण्यासाठी सशक्त सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, गृहिणी, छोटे व्यावसायिक तसेच पर्यटकांची गैरसोय होते.

ऐतिहासिक वस्तू समृद्ध असलेल्या पवन मावळ परिसरात पीएमपीएमएल बस सेवा सुरु केल्यास परिसरातील नागरिकांसह पर्यटकांची देखील मोठी सोय होईल. प्रशासकीय कामासाठी कामशेत, वडगाव येथे जाण्यासाठी नागरिकांना ताठकळत थांबावे लागणार नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे पवन मावळातील पर्यटनास चालना मिळेल. स्थानिक विकासाला देखील गती येईल.

निगडी – देहूरोड – तळेगाव – वडगाव – कामशेत-कडधे – पवनानगर – किल्ले तिकोनागड अशी बससेवा सुरु करावी. दर अर्ध्या तासाला बस सुटल्यास नागरिकांची गैरसोय दूर होईल. नागरिक आणि पर्यटक देखील या सेवेला चांगला प्रतिसाद देतील. यामुळे पीएमपीएमएलच्या उत्पन्नात देखील भर पडणार आहे. त्यामुळे ही बससेवा नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, महिला, व्यावसायिक, पर्यटक यांच्यासह पीएमपीएमएलच्या देखील फायद्याची ठरेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.