Pimpri News : ‘रामनवमी माझ्या नावाने साजरी करायची, इथला बाप एकच… तो मी आहे’

इसमाला मारहाण, पिंपरी पोलिसांत टोळक्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – ‘आपल्या एरियात रामनवमी साजरी करायची नाही, केलीच तर, माझ्या नावाने साजरी करायची. इथला बाप एकच,’ असे म्हणून एका इसमाला मारहाण केली व पोलिसांत गेल्यास तुझा मर्डर करतो अशी धमकी दिली. याप्रकरणी 7 ते 8 जणांच्या पिंपरी पोलिसांत टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संत तुकाराम नगर, पिंपरी येथे सोमवारी (दि.28) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

महेश माणिक आंधाळे (वय 28, रा. गंगा नगर, संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दिनेश पाटील, अभिनव पाटील, निलेश जैसवाल (सर्व रा. गंगा नगर, संत तुकाराम नगर, पिंपरी) आणि इतर 4 ते 5 जणांविरोधात भारतीय दंड विधान कलम 323, 141, 143, 146, 147, 149 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश हे घरात झोपले होते. त्यावेळी आरोपी टोळके फिर्यादी यांच्या घराबाहेर आले. आरोपी दिनेश शिवीगाळ करत म्हणाला की, ‘आपल्या एरियात राम नवमी साजरी करायची नाही, केल्यास माझ्या नावाने साजरी करायची, बॅनरवर माझे नाव टाकायचे, इथला बाप एकच तो मी आहे.’

तसेच, तू मी ठेवलेल्या कर्यक्रमांना येत नाही, तुला लय मस्ती आहे, असे म्हणून फिर्यादी यांच्या कानाखाली वाजवली. तसेच आरोपी अभिनव आणि निलेश याने लाथ मारली. फिर्यादी घरात पळून जात असताना तू पोलिसांत गेलास तर तुझा मर्डर करेन अशी धमकी आरोपी दिनेशने दिली. असे महेश यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.