Chakan News : दिवाळीत डॉक्टर गावी ; चोरटे घरी, सलग दुसऱ्या वर्षी चोरट्यांचा डल्ल्ला

  चाकण ग्रामीण रुग्णालयातील प्रकार

एमपीसी न्यूज : दिवाळीसाठी गावी गेलेल्या डॉक्टरांच्या घरी चोरट्यांनी महागडा टीव्ही व प्रापंचिक साहित्य लंपास करून सलग दुसऱ्या वर्षी दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न केला. मागील वर्षी देखील याच डॉक्टरांच्या चाकण ग्रामीण रुग्णालयातील घर फोडून दिवाळीत चोरट्यांनी सोन्याचे दागिने व अन्य साहित्य लंपास केले होते. मागील वर्षीचा अनुभव पाहता डॉक्टरांनी यंदा गावी जाताना दागिने व मौल्यवान वस्तू सोबत नेल्याने चोरट्यांना टीव्ही व अन्य प्रापंचिक साहित्यावर समाधान मानावे लागले आहे.

चाकण  (ता. खेड) ग्रामीण रुग्णालयातील जुन्या इमारतीच्या पाठीमागील बाजूस डॉ. वसंत झगडे हे वास्तव्यास आहेत. दिवाळीची सुट्टी असल्याने ते गावी गेलेले असताना चोरट्यांनी रात्रीच्या वेळी त्यांच्या घरावर डल्ला मारला. सदरचा प्रकार रविवारी (दि.७) सकाळी उघडकीस आला.

घराचा दरवाजा खालील बाजूने फोडून आत प्रवेश करून कपाटातील साहित्य अस्ताव्यस केले. कपाटात काहीही न मिळाल्याने त्यांनी स्वयंपाक घरातील सर्व साहित्य अस्तव्यस्त केले. अखेरीस त्यांनी घरातील टीव्ही व अन्य साहित्य घेऊन पोबारा केला. डॉक्टर कुटुंबीय गावी असल्याने चोरट्यांनी आणखी नेमके काय-काय नेले हे स्पष्ट झालेले नाही.

डॉ. वसंत झगडे यांनी या बाबत सांगितले कि, मागील वर्षी देखील चोरट्यांनी घर फोडले होते. त्यावेळी दागिने चोरीस गेले होते. त्यामुळे यंदा गावी येताना घरी टीव्ही व्यतिरिक्त काहीही ठेवलेले नव्हते. घरफोडी झाल्यानंतर ५० हजारांचा महागडा स्मार्ट टीव्ही व अन्य साहित्य नसल्याचे स्थानिक कर्मचार्यांनी कळवले आहे. गावी असल्याने या बाबत अद्याप पोलिसांत तक्रार दिलेली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.