Akurdi : कार्यकुशलतेच्या अभावामुळे सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्येत वाढ- जितेंद्र सांडू

एमपीसी न्यूज – आपल्या देशात तीन हजारापेक्षा जास्त व्यवस्थापन कॉलेजेसमधून ३.६० लाख विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतात. मात्र त्यांच्यातील कार्यकुशलतेच्या अभावामुळे भारतात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढतच आहे, असे मत टॅलेंट ॲसेसमेंट ॲन्ड ॲनॅलिटिक्स सॉफ्टवेअर सोल्यूशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र सांडू यांनी व्यक्त केले.

आकुर्डी येथील डॉ. डी.वाय.पाटील इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या वतीने आयोजित केलेल्या पालक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पुंबाच्या डॉ. सुप्रिया पाटील, श्वेता चव्हाण पाटील, डीवाय पाटील इंस्टिट्यूटचे संचालक डॉ. आशुतोष मिसाळ आदी उपस्थित होते.

यावेळी प्रणाली फोकमारे हिला अष्टपैलू विद्यार्थीनीचा पुरस्कार देण्यात आला. दहा हजार व सुवर्णपदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्राची पावडे हिला दुसऱ्या क्रमांकाचा अष्टपैलू विद्यार्थीनी पुरस्कार म्हणून सिल्व्हर मेडल व सात हजाराचा धनादेश देण्यात आला. रिद्धी वर्तक व पुजा अलोणे यांना विभागून तिसऱ्या क्रमांकाचा अष्टपैलू विद्यार्थीनी पुरस्कार प्रदान करण्यात आला. ब्रॉंझ मेडल व ३ हजाराचा धनादेश देण्यात आला. यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कॉलेजमधील ५२ जणांना रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.

सांडू पुढे म्हणाले की, आजचे तरुण योग्य व स्मार्टपणे करियर निवडत नसल्याने अपयशी ठरत आहे. आज केवळ ३% कुशल विद्यार्थी घडत आहे. आज आपल्या देशात बेरोजगारांची संख्या १ कोटी ८० लाख इतकी आहे. आवडीच्या क्षेत्रात करियर करा. आयुष्यात एक चुक करू नका. जीवनाचा आनंद घ्या. प्रास्ताविक व स्वागत डॉ. मिसाळ यांनी केले. सूत्रसंचालन नेहा नाईक व निधी दत्ता यांनी केले. तर आभार प्रा.प्रियांका मिश्रा यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.