Editorial : माय पुणे सिटी, माय न्यूज पोर्टल !

पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ, खेड, मुळशी परिसरातील स्थानिक घडामोडींचा वेध घेणाऱ्या mpcnews.in या मराठी सिटी न्यूज पोर्टलला जगभरातून 46 लाखांहून अधिक युनिक व्हिजिटर्सनी गेल्या 11 वर्षांत कोट्यवधी व्हिजिट्स दिल्याचे ‘गुगल अॅनॅलिटिक्स’ वरून पहायला मिळते. त्यामुळे शहराच्या ग्लोबल नेटवर्किंगमध्ये एमपीसी न्यूजने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड या जुळ्या शहरांविषयी कमालीची उत्सुकता वाढताना दिसत आहे. त्यामुळेच ‘एमपीसी न्यूज डॉट इन’ या सिटी न्यूज पोर्टलचा पसारा दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी-चिंचवडमधील यशस्वी वाटचालीनंतर आम्ही तीन वर्षांपूर्वी पुणे शहरात कार्यविस्तार सुरू केला. गेल्या तीन वर्षांत पुणेकरांकडूनही ‘एमपीसी न्यूज’ला भरभरून प्रेम मिळाले. या तीन वर्षांत एमपीसी न्यूजच्या दर्शक संख्येत १० पटींनी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. ही पुणेकरांनी आम्हाला दिलेली पसंतीची पावती आहे.

‘स्मार्ट सिटी’ पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील स्मार्ट मीडिया म्हणून ओळखले जाणारे एमपीसी न्यूज हे सिटी न्यूज पोर्टल म्हणजे दोन सर्वसामान्य पत्रकारांनी लावलेले रोपटे! आता हे रोपटे चांगलेच फोफावले असून त्याचा डेरेदार वटवृक्षात रुपांतर होत आहे.
दहा वर्षांपूर्वी म्हणजे 22 जुलै 2008 ला आम्ही माय पिंपरी चिंचवड डॉट कॉम या नावाने शहरातील पहिले सिटी न्यूज़ पोर्टल सुरू केले. त्यावेळी ‘ऑनलाईन मीडिया’ या शहरवासीयांसाठी पूर्णपणे नवीन होता. शहरात ऑनलाईन मीडिया रुजवण्यापासूनचे आव्हान तेव्हा आमच्यापुढे होते. निर्भिड, निष्पक्षपाती आणि विश्वासार्ह पत्रकारिता करीत एमपीसी न्यूजच्या टीमने हे आव्हान केवळ स्वीकारलेच नाही तर समर्थपणे पेलले आहे. एमपीसी न्यूजचे अनुकरण करीत त्यानंतर शहरात डझनभर न्यूज पोर्टल सुरू झाली आहेत, हे एमपीसी न्यूजच्या यशाचे प्रमाण आहे, हे आम्ही नम्रतापूर्वक सर्वांच्या निदर्शनास आणू देऊ इच्छतो.

पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ, खेड, मुळशी परिसरातील स्थानिक घडामोडींचा वेध घेणारे हे न्यूज पोर्टल इंटरनेटच्या जाळ्यातून जगभर पसरेल, याची पुसटशीही कल्पनाही आम्हाला 11 वर्षांपूर्वी नव्हती. शहर व जिल्ह्यातील लोकांना हव्या असणाऱ्या लोकल ब्रेकिंग न्यूज आम्ही देत गेलो. या परिसराशी संबंधित मात्र जगभर विखुरलेले नेटीझन्स एमपीसी न्यूजला जोडले जाऊ लागले. जगभरातून तब्बल 46 लाखांहून अधिक दर्शकांनी गेल्या 11 वर्षांत ‘एमपीसी न्यूज’ला कोट्यवधी वेळा भेट दिल्याचे ‘गुगल अॅनॅलिटिक्स’ सांगते.

सुरूवातीला महिन्याला काही हजार हिट्स मिळायच्या आता महिन्याला काही कोटी हिट्स मिळतात, याचे सर्व श्रेय आम्ही आमच्या दर्शकांना देतो. आधुनिकता आणि नावीन्याचा ध्यास घेऊन 2008 पासून शहरवासीयांची सेवा करणाऱ्या टीम एमपीसी न्यूजने मोबाईल क्रांतीनंतरची गरज लक्षात घेऊन एसएमएस न्यूज अलर्ट्स सेवा सुरू केली. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करीत फेसबुक पेज, व्हॉट्सअॅप बुलेटीन, ट्विटर, यूट्यूबच्या माध्यमातून शहरातील ताज्या घडामोडींबाबत जगाला अपडेट ठेवण्याची कामगिरी केली. बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन स्थानिक बातम्या देणारे एमपीसी न्यूज हे शहरातील पहिले मोबाईल अॅप्लिकेशन सुरू करण्याचा मानही आम्हाला मिळाला. आठ मार्च 2018 पासून आम्ही दररोज सकाळी ताज्या बातम्या देणारे ऑडिओ बुलेटीन व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून प्रसारित करण्यास सुरूवात केल्यामुळे बातम्यांचे श्रवण करण्याचा आनंदही आमच्या श्रोत्यांना उपलब्ध झाला आहे. फेसबुकवरील अपडेट्स प्रमाणे आम्ही व्हॉट्सअॅपचे ग्रुप बनवून हजारो दर्शकांना अपडेट ठेवण्याचे काम करतो.

नागरिकांच्या सुख-दुःखात साथ देणारा हक्काचा सोबती, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराचा आरसा, कोणत्याही पुढाऱ्याचा अथवा राजकीय पक्षाचा नव्हे तर सर्वसामान्य जनतेचा आवाज असणारे एमपीसी न्यूज डॉट इन हे न्यूज पोर्टल आता पुणे व पिंपरी-चिंचवडकरांचा जणू ऑनलाईन “जीवनसाथी” बनले आहे, असे म्हटल्यास ते अतिशयोक्तीचे होणार नाही. हाडाच्या पत्रकारांनी सर्वसामान्यांसाठी सिटी न्यूज पोर्टल चालविण्याच्या या प्रयोगाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. एमपीसी न्यूज हे मंथन राष्ट्रीय पारितोषिक विजेते शहरातील एकमेव सिटी न्यूज पोर्टल आहे, ही बाबही अभिमानास्पद आहे.

गेल्या 11 वर्षांच्या काळात आम्ही चार वेळा एमपीसी न्यूज या न्यूज पोर्टलला नवीन चेहरा दिला. अधिक आकर्षक मांडणी असलेले यूजर फ्रेंडली न्यूज पोर्टल विकसित करण्यासाठी आमचे सातत्याने नवनवीन प्रयोग सुरू असतात. अत्याधुनिक फिचर्सचा समावेश असलेले नव्या स्वरूपातील एमपीसी न्यूज वाचकांच्या पसंतीस उतरले आहे. एमपीसी न्यूजचे मोबाईल अॅप्लीकेशनही नव्या स्वरूपात आपल्या सेवेत सादर केले आहे. येत्या काही दिवसांत व्हिडिओ न्यूज अधिक आकर्षक पद्धतीने देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

हे सर्व काम करत असताना एमपीसी न्यूजने जर्नालिझम स्कूलची भूमिकाही समर्थपणे बजावली आहे. गेल्या 11 वर्षांत एमपीसी न्यूजमध्ये पत्रकारितेचे धडे घेतलेले 70 हून अधिक पत्रकार आज राज्यातील विविध वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या व न्यूज पोर्टलमध्ये त्यांच्या कामाचा स्वतंत्र ठसा उमटवत आहेत.

स्मार्ट सिटीमधील या स्मार्ट मीडिया हाऊसच्या यशामध्ये आपण सर्व वाचक, दर्शक, हितर्चितक, जाहिरातदार, तांत्रिक सल्लागार, पत्रकार सहकारी व अन्य टीम मेंबर असे आपण सर्वजण बरोबरीचे भागीदार आहात. आपल्या भक्कम पाठबळाशिवाय ही आव्हानात्मक वाटचाल केवळ अशक्‍य होती. त्यामुळे पुणे कार्यालयाचा तिसरा वर्धापनदिन साजरा करीत असताना आपणा सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, हे आमचे कर्तव्य आहे. आमच्यावरील आपला विश्वास आणि प्रेम असेच पुढे राहू देत. आम्ही देखील हीच ग्वाही देतो, राहा एकदम अपडेट, कधीही, कुठेही!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.