Nigdi News : अनुभव शब्दबद्ध करणे ही आनंददायी बाब – विनिता ऐनापुरे

एमपीसी न्यूज –  “जीवनातील भलेबुरे अनुभव शब्दबद्ध करणे ही आनंददायी बाब असते. वाचनसंस्कार आणि आपण जसे जगतो तसे प्रामाणिकपणे मांडल्यास लेखन वास्तववादी होते!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक विनिता ऐनापुरे यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, पेठ क्रमांक 25, निगडी प्राधिकरण येथे नगरसेविका शर्मिला बाबर, शब्दरंग साहित्य कट्टा (प्राधिकरण) आणि रुपेरी कडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिले मराठी साहित्य संमेलन या कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विनिता ऐनापुरे बोलत होत्या. भारतीय विचार साधनाचे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे, भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रजनी शेठ यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वागताध्यक्ष शर्मिला बाबर यांनी आपल्या मनोगतातून संमेलन आयोजित करण्यामागची भूमिका मांडली. डॉ. गिरीश आफळे यांनी, “1990 साली कुष्ठरुग्णसेवेतून लेखनाची स्फूर्ती मिळाली!” असे सांगून आपली साहित्यिक जडणघडण मांडली. याप्रसंगी डॉ. अर्चना वर्टीकर लिखित ‘मी कात टाकली…!’ या कादंबरीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

उद्घाटनानंतर सुभाष भंडारे (परिसंवाद), चंद्रशेखर जोशी (मनोरंजन), सतीश सगदेव (अभिवाचन), आनंद मुळूक (काव्य कट्टा) यांनी विविध सत्रांचे उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे सुमारे सदुसष्ट साहित्यिक-कलावंतांनी रसिकांना साहित्य अन् संस्कृतीची परिपूर्ण मेजवानी दिली. ‘पुस्तकांचे महत्त्व कमी होते आहे का?’ या परिसंवादात विश्वास करंदीकर, समिता टिल्लू, शुभदा दामले यांनी पुस्तकांचे महत्त्व कधीच कमी होणार नाही; परंतु ऑनलाईन वाचन ही आता काळाची गरज आहे, असे निष्कर्ष काढले.

मनोरंजनाच्या सत्रात एकपात्री अभिनय, विडंबन, नाट्यछटा अशा वैविध्यपूर्ण सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. प्रियांका आचार्य यांचा उत्कंठा ताणून धरणारा एकपात्री प्रयोग आणि विशेषतः पंचाऐंशी वर्षे वयाच्या रामचंद्र कुंभार यांनी ‘नटसम्राट’ या नाटकातील स्वगतांचे साभिनय सादरीकरण करून उपस्थितांना अंतर्मुख केले.

मधुवंती हसबनीस, सुचेता सहस्रबुद्धे, प्रणिता बोबडे यांच्या ‘नवसाची बायको’ या ग्रामीण विनोदी कथेच्या अभिवाचनाला हशा अन् टाळ्यांची दाद मिळाली. काव्यकट्ट्यात सुमारे तीस कवींनी सहभागी होऊन आशयसंपन्न कवितांचे सादरीकरण केले. प्रत्येक सत्राच्या प्रारंभी नूपुर नृत्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या सुंदर नृत्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. समारोपाच्या सत्रात ह.भ.प. किसनमहाराज चौधरी, ज्येष्ठ साहित्यिक माधुरी ओक, निमंत्रक राजेंद्र बाबर यांनी सहभाग घेतला. ज्योती कानेटकर यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले. अलका भालेकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.