Chakan Crime News : तरुणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न करणा-या विवाहित तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पहिले लग्न झालेले असताना तरुणाने नर्स असलेल्या एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला खेड तालुक्यातील मोहितेवाडी येथे नेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले तसेच तरुणाने स्वतः देखील आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना 19 डिसेंबर रोजी सकाळी दहा ते 20 डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या कालावधीत घडली.

मयत 22 वर्षीय तरुणीच्या 45 वर्षीय वडिलांनी सोमवारी (दि. 27) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हरिदास कुंडलिक देवचे (वय 27, रा. जांभुळशी, ता. जुन्नर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शेती करतात. तर त्यांची मुलगी शिरूर येथे एका हॉस्पिटलमध्ये मागील तीन ते चार महिन्यांपासून नर्स म्हणून काम करत होती. आरोपी हरिदास याचा विवाह झाला आहे, तरी देखील त्याने फिर्यादी यांच्या मुलीला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला खेड तालुक्यातील मोहितेवाडी येथे बोलावून तिला गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. त्यांनतर हरिदास याने देखील गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

20 डिसेंबर रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्यांनतर पोलिसांनी तरुणीचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. हरिदास याला पुढील उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तरुणीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर ‘हरिदास आणि फिर्यादी यांच्या मुलीला फोनवर बोलताना फिर्यादी यांच्या लहान मुलाने पाहिले असल्याचे त्याने वडिलांना सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. पोलीस उपनिरीक्षक शेंडकर याप्रकरणी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.