Sandeep Waghere : अखेर रेल्वे उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा, महापालिकेच्या वतीने निविदा प्रसिद्ध; संदीप वाघेरे यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज –  पिंपरी मिलेट्री डेअरी फार्म येथील बहुचर्चित रेल्वे उड्डाणपुलाच्या मार्ग अखेर मोकळा झाला आहे. याबाबत महापालिकेच्या बीआरटीएस विभागाच्या वतीने 58 कोटी 57 लाख 30 हजार 577 रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच पुलाचे काम सुरु होईल अशी माहिती माजी नगरसेवक संदीप वाघेरे (Sandeep Waghere) यांनी दिली आहे.

पिंपरी येथील मिलेट्री डेअरी फार्म येथील बहुचर्चित मिलिटरी डेअरी फार्म येथे तयार होणाऱ्या रेल्वे उड्डाणपूल जागेचे डिमार्केशन व इतर कामे तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना तत्कालीन नगरसेवक संदीप वाघेरे यांनी अधिकाऱ्यांना केल्या. 1 फेब्रुवारी 2019 रोजी पाहणी केली. त्यानुसार 5 फेब्रुवारी रोजी ट्रायल पीट  घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली होती. त्यानुसार केवळ 14 दिवसात रेल्वे लाईनच्या बाजूला ट्रायल पीट घेण्याचे काम पूर्ण झाले होते. यानंतर उड्डाणपूल यासंदर्भातील 8081 चौरस मीटर क्षेत्रावर काम सुरू करण्याबाबतची परवानगी 17 ऑगस्ट 2020 रोजी मिलेट्री डेअरी फार्मचे ऑफिस इन्चार्ज लेफ्टनन कर्नल ग्यान प्रकाश यांनी  महापालिकेला दिली होती.

त्यानुसार महापालिकेच्या वतीने पुढील उर्वरित एकूण 23 हजार 842 स्क्वेअर मीटर ( 5.98 एकर ) जागा ताब्यात घेण्याकामी महापालिकेच्या वतीने  एकूण 20 कोटी 98 लाख रुपये जुलै मध्ये भरण्यात आले. त्यानुसार रेल्वे उड्डाणपुलासाठी लागणारे संपूर्ण क्षेत्र ताब्यात आल्यानंतर स्थापत्य प्रकल्प विभागाच्या वतीने रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

मिलेट्री डेअरी फार्म येथील उड्डाणपुलाचे काम मार्गी लावण्याकामी तत्कालीन नगरसेवक संदीप वाघेरे यांनी तत्कालीन रक्षा मंत्री निर्मला सीतारमण यांची दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले होते. तसेच मिनिष्ट्री ऑफ डिफेन्स,डिफेन्स इस्टेट ऑफिस याठिकाणी देखील वाघेरे (Sandeep Waghere) यांच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला होता.

उड्डाणपुलासाठी महापालिका आयुक्त राजेश पाटील, स्थापत्य प्रकल्प विभागाचे श्रीकांत सवने, बापू गायकवाड,शेखर गुरव, प्रेरणा शिनकर, संतोष कुदळे यांचे सहकार्य लाभले असल्याने वाघेरे यांच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले. मुंबई-पुणे महामार्ग ते पावर हाउस चौक पिंपरी पर्यंत रेल्वे उड्डाणपुलाचे  पुलाचे काम मार्गी लागत असल्याने पिंपरीगाव व परीसरातील नागरिक आनंद व्यक्त करीत आहेत. रेल्वे उड्डाणपुलाचे काम पुर्ण झाल्यावर शगुन चौक, पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी,साई चौकातील भुयारी मार्ग तसेच  पिंपरीगाव व परिसरामध्ये होणारी वाहतूक कोंडी सुटणार आहे. तसेच पुणे मुंबई महामार्गाकडे येजा करणाऱ्या नागरिकांना सोयीचे होणार आहे. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रेल्वे उड्डानपुलाचे काम मार्गी लागण्यात यश आले आहे असे मत वाघेरे यांनी व्यक्त केले. या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यास पिंपरीगाव, पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी  परिसरातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.