Short Film Festival : पुण्यात भरणार पहिला राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सव

एमपीसी न्यूज – पर्यटन विभाग, महाराष्ट्र राज्य आणि परभन्ना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.पुणेकरांना 26 व 27 सप्टेंबर या दोन दिवशी पुण्यातील राष्ट्रीय फिल्म संग्रहालयात या लघुपट महोत्सवाचा आनंद घेता येणार आहे.

या लघुपट महोत्सवात लघुपट, माहितीपट, व्ही-लॉग, छायाचित्रण या माध्यमातून सहभागी होता येईल.सहभाग घेण्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर अशी आहे, अशी माहिती लघुपट महोत्सवाचे प्रमुख व परभन्ना फाउंडेशनचे गणेश चप्पलवार यांनी दिली.

लघुपट महोत्सवाचे परीक्षक म्हणून ‘एफटीआय’चे माजी अधिष्ठाता अमित त्यागी, माहितीपट व चित्रपट निर्माते आदित्य शेट, ऐतिहासिक चित्रपट अभ्यासक मोनिया अचारी (जर्मनी), लेखक आणि चित्रपट निर्माते अक्षय इंडीकर, प्रा. वैशाली केंदळे, लेखक आणि दिग्दर्शक जुनेद इमाम, चित्रपट निर्माते अमर देवकर, संजय दानाईत काम पाहणार आहेत.पर्यटन क्षेत्रातील आजीवन पुरस्कार, सर्वोत्कृष्ट लघुपट, सर्वोत्तम माहितीपट, सर्वोत्तम छायाचित्रण, सर्वोत्तम दिग्दर्शक, विशेष जूरी उल्लेख पुरस्कार देण्यात येणार आहेत.अधिक माहितीसाठी ९७३०४६४३२९ यावर संपर्क साधावा, असे आवाहन चप्पलवार यांनी केले आहे.

पर्यटन विभागाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे, माध्यम व संज्ञापन विभागातील प्रा. विश्राम ढोले, सिम्बायोसिस विद्यापीठातील प्रा. राजीव घोडे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक दीपक हरणे, सल्लागार सचिन इटकर, यशदा येथील प्रशासकीय अधिकारी डॉ. बबन जोगदंड आदींचे या महोत्सवासाठी सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.