Bhosari News : इंद्रायणीनगरमध्ये पाणी टाकी उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याचा माजी नगरसेवकाचा दावा

एमपीसी न्यूज – इंद्रायणीनगर, धावडेवस्ती, भगतवस्ती आणि गुळवेवस्ती भागातील सुमारे 50 हजारांहून अधिक कुटुंबियांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या पाणीच्या टाकीच्या उभारणीचा प्रश्न अखेर मार्गी लागल्याचा दावा भाजपच्या माजी नगरसेवकाने केला आहे. तांत्रिक बाजूंची पडताळणी करुन पाण्याची टाकी उभारावी, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याचे माजी नगरसेवक राजेंद्र लांडगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविला. मात्र, त्यांनी न्यायालयाच्या आदेशाची प्रत प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली नाही.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीत पेठ क्रमांक 1 प्लॉट क्रमांक 4 येथे 1933.03 या मोकळ्या जागेवर पाण्याची टाकी (जलकुंभ) उभारण्याचा प्रस्ताव क- प्रभाग समितीमध्ये 5 नोव्हेंबर 2018 रोजी (ठराव क्रमांक 38) मंजुर केला होता. महापालिका प्रशासनाने त्याचे कार्यादेशही दिले होते. मात्र, राजकीय दबावापोटी आणि श्रेयवादातून संबंधित टाकीचे काम प्रलंबित ठेवण्यात आले. हा वाद न्यायालयात पोहोचला होता.

”संबंधित पाण्याच्या टाकीचे काम थांबवण्यात यावे, असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात झालेल्या एका बैठकीत महापालिका प्रशासनाला दिले होते. त्याबाबतचे लेखी पत्र समोर आले आहे. आम्ही न्यायालयात गेलो. न्यायालयाने तांत्रिक बाजुंची पडताळणी करुन पाण्याची टाकी उभारावी असे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाने कार्यवाही करावी. निविदा प्रक्रिया आणि अन्य बाबींची पूर्तता झाली आहे. काहीअंशी कामही झाले आहे. त्याच ठिकाणी काम वेगाने सुरू करणे अपेक्षीत आहे. भगतवस्ती- गुळवेवस्ती, धावडेवस्ती आणि इंद्रायणीनगर परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने पाण्याची टाकी उभारणे अत्यावश्यक आहे”, असे माजी नगरसेवक राजेंद्र लांडगे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.