Khadki News : सामाजिक सलोख्याचं अनोखं दर्शन, सलग तीन वर्षांपासून गणपती बाप्पा आणि ताबूत यांची एकत्र स्थापना

Ganpati bappa and Taboot under one roof in Khadki bazaar.

एमपीसी न्यूज – गणेश चतुर्थी आणि मोहरम यांची एकत्र सुरुवात झाली आणि शनिवारी (दि.22) हिंदूंचे आराध्य दैवत गणपती बाप्पा घरोघरी विराजमान झाले तसेच एक दिवस अगोदर म्हणजे शुक्रवारी (दि.21) मुस्लिमांच्या मोहरमची सुरुवात झाली व ठिकठिकाणी ताबूत बसवण्यात आले. मात्र, खडकीतील छावणी परिसरातील एका सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने सामाजिक सलोख्याचं अनोखं दर्शन घडवत. गणपती बाप्पा आणि ताबूत यांची एकाच मंडळात एकत्र स्थापना केली आहे. अशा प्रकारे एकत्र उत्सव साजरा करण्याचे हे त्यांचे सलग तिसरे वर्ष आहे.

खडकी छावणी परिसरातील मधला बाजार मित्र मंडळ ट्रस्ट या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने हा अभिनव उपक्रम केला आहे. मुस्लिमांसाठी पूजनीय असलेल्या ताबूत आणि हिंदूंचे दैवत असलेल्या गणपती बाप्पांची स्थापना एकाच मंडळात एकत्र करण्यात आली आहे.

हे मंडळ सलग तीन वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहेत. हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधव यांनी एकत्र येऊन वेगवेगळा उत्सव साजरा करण्याऐवजी दोन्ही उत्सव एकत्र साजरा करण्याचा निर्णय घेत, धार्मिक एकता आणि सामाजिक सलोख्याचं अनोखं दर्शन घडवले आहे.

या उपक्रमाबद्दल माहिती देताना मधला बाजार मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष चिंतन शाह यांनी असे सांगितले की, सत्तावीस वर्षांतून एकावेळेस सलग तीन वर्ष मोहरम आणि गणेश उत्सव हा एकाच वेळी सुरु होतो.

त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम बांधव आम्ही सर्वजण एकत्र येऊन दोन्ही उत्सव एकाच ठिकाणी आणि एकाच मंडपात साजरा करायचा निर्णय घेतला. सर्वानी या निर्णयाला होकार दिल्यानंतर मागील दोन वर्षांपासून आम्ही हा उत्सव यशस्वीपणे पार पाडत असून हे तिसरे वर्ष आहे.

शाह पुढे असे म्हणाले, मधला बाजार मित्र मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम देखील आयोजित केले जातात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर मंडळातर्फे प्रथमोउपचार संच वाटप, आरोग्य तपासणी शिबीर तसेच रक्तदान शिबीर याचे आयोजन करण्यात आले आहे.

या अभिनव उपक्रमाबाबत कोणीही विरोध न केल्याचं चिंतन शाह यांनी सांगितले. ताबूत विसर्जनासाठी तसेच गणेश विसर्जनासाठी दोन्ही समाजातील लोक एकत्र येऊन काम करतात व एकमेकाला मदत करतात असे चिंतन शाह म्हणाले.

अगदी साध्या पद्धतीने उभारण्यात आलेल्या या मंडळाभोवती सामाजिक संदेश देणारे फलक उभारण्यात आले आहेत. कोरोनाच्या काळात योध्याची भूमिका पार पाडणाऱ्या डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, सैनिक, पोलीस सफाई कामगार यांचे आभार मानणारे फलक लावण्यात आले आहेत तसेच या महामारीच्या काळात सुरक्षेच्या संबंधित विविध संदेश देण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.