Talegaon : नगरसेवकांना वार्षिक लेखे आणि टिप्पणी वेळेवर न मिळाल्याने सर्वसाधारण सभा रद्द

तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीकडून सभेची नोटीस आणि वार्षिक लेखे जाळून निषेध

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या  विशेष सभेची वार्षिक लेखे आणि टिपणी नगरसेवकांना वेळेवर मिळाले नाहीत. तसेच या विशेष सभेकडे सत्ताधारी नगरसेवकांनी पाठ फिरवली. यामुळे आज (सोमवारी) होणारी सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली. सर्वसाधारण सभा रद्द झाल्याची सूचना खुद्द नगराध्यक्षांनी अर्धा तास उशिरा येऊन सभागृहाला दिली. यामुळे तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीच्या नगरसेवकांनी सत्ताधारी सभेची नोटीस आणि वार्षिक लेखे जाळून निषेध व्यक्त केला.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सभागृहात नगराध्यक्षा विशेष सभेस वेळेवर न येता, त्यांनी सभा रद्द झाल्याचा निरोप स्वतः आणला. तो निरोप देखील उशिरा मिळाल्याने तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे, नगरसेवक संतोष भेगडे, अरूण माने, वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, आनंद भेगडे आदींनी सभेची नोटीस आणि वार्षिक लेखे यांची होळी केली. अशा प्रकारची घटना तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच घडली. पालिका वर्तुळात याबाबत जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

नगराध्यक्षा चित्रा जगनाडे म्हणाल्या, “नगरसेवकांना लेखे व टिपणी उशिरा मिळाल्या आहेत. याबाबतची चौकशी करून त्याचा जाब संबधित अधिका-यांना विचारला जाणार आहे. तसेच उशीरा लेखे व टिपणी देणा-या संबंधित अधिका-यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे यांनी देखील सभेचा अजेंडा मिळाला नसल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

किशोर भेगडे म्हणाले, “सत्तारूढ भारतीय जनता पक्षाचा स्वच्छता हा महत्वपूर्व अजेंडा आहे. आजच्या सर्वसाधारण सभेत स्वच्छतेचे विषय चर्चेसाठी मांडण्यात येणार होते. मात्र तळेगाव नगरपरिषदेतील सत्ताधा-यांना याबाबत काहीच गांभीर्य नाही. त्यांनी आपल्याच स्वच्छतेच्या धोरणांची खिल्ली उडवली आहे.” सत्तारूढ पदाधिका-यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याचा आरोप यावेळी भेगडे यांनी केला.

भारतीय जनता पक्षाचे बहुतेक सर्वच नगरसेवक नगरपरिषदेत हजर होते; मात्र त्यांनी सभागृहाकडे पूर्ण पाठ फिरवली. हा विषय गुलदस्त्यात असून मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी सर्व सदस्यांना सभेची नोटीस आणि वार्षिक लेखे यांचे वितरण वेळेत झाले असल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.