Pune : द्राक्ष उत्पादकांना सरकारने अनुदान द्यावे – माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार

एमपीसी न्यूज – द्राक्षांची सागरी वाहतूक, बेदाणा चाळ तसेच द्रक्षांसाठी प्लास्टिकचे आच्छादन या गोष्टींसाठी सरकारने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यायला हवे, (Pune) असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

Pcmc : सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या होणार जनसंवाद सभा

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६३ व्या द्राक्ष परिषदेचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. फलोत्पादक संचालक डॉ. कैलास मोते, बागाईतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार, उपाध्यक्ष कैलास भोसले, सुनील पवार, चंद्रकांत लांडगे या वेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, तयार द्राक्षावर अवलंबून न राहता बेदाणा हा चांगला पर्याय आहे. भारतात ३०० लाख मेट्रिक टन बेदाणाचे उत्पादन आहे. अफगाणिस्तानमधून २५ हजार टन बेदाणा भारतात येतो. २७५ रुपये प्रतिकिलोप्रमाणे आयात होतो. देशाची एकंदर गरज पाहता त्याच्या ५० टक्के सुद्धा बेदाणा आपण तयार करत नाही.

बेदाण्याची विक्री वाढविण्यासाठी गुणवत्ता पूर्वक उत्पादन घेण्याची अतिशय गरज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात बेदाण्याची मोठी आवश्यकता आहे. त्यामुळे बेदाणा निर्मितीत वाढ होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्याची जाहिरात केली पाहिजे. इंग्लंड, जर्मनी, नेदरलँड या देशात बेदाण्याची मागणी नाही. पण, गुणवत्ता, किंमतीमध्ये जागरूक राहिले तर अडचण येणार नाही. तसेच कांद्याच्या चाळी प्रमाणे बेदाण्याच्या चाळीला अनुदान द्यावे.

गारपीटीचे संकट, नैसर्गिक आपत्ती आल्यास द्राक्ष उत्पादक शेतकरी अतिशय संकटात येतो. नैसर्गिक आपत्ती आल्यास द्राक्ष शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. ते टाळण्यासाठी द्राक्षांच्या बागेवर प्लास्टिकच्या आच्छादनाची गरज निर्माण झाली आहे. त्याकरिता राज्य सरकारने कमीत कमी ५० टक्के अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे. द्राक्ष परदेशात विमानाने नेली जात नाहीत. सागरी मार्गाने त्याची वाहतूक केली जाते.

सागरी मार्गाचे भाडे जास्त आहे. एकेकाळी द्राक्ष वाहतूक करणाऱ्या कंटेनरला सबसिडी मिळत होती. ती सवलत थांबविली आहे. ती सवलत पुन्हा मिळावी यासाठी केंद्र सरकारला बोलावे लागेल. द्राक्षाचा जास्तीत जास्त माल जगात पाठविला पाहिजे, असेही पवार यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले, द्राक्ष उत्पादक शेतकरी हा अतिशय कष्टाळू आहे. त्यामुळे त्याचे जीवनमान देखील सुधारायला हवे. संघटनेच्या कष्टाला आणि संघटनेला तोड नाही. १९६० साली बारामतीत या संघटनेचा जन्म झाला. काही ठराविक लोक एकत्र येत याची स्थापना करण्यात आली. अनेक लोक अनेक संस्थेत काम करत होते.

द्राक्ष संबंधित पिकाच्या अनेक अडचणी सोडवण्यासाठी या संस्थेचा उदय झाला. राज्यातील अनेक ठिकाणांहून लोक एकत्र आले. ३५ हजार आपल्या या संघटनेचे सभासद आहेत. केंद्र राज्य शासनाचे धोरण आणि संशोधन करण्यासाठी ही संस्था महत्वाची आहे.

ते पुढे म्हणाले, राज्यात आणि देशात अनेक पिकांच्या संघटना आहेत. उत्तरेकडे सफरचंद पिकाची संघटना आहे. दक्षिणेत नारळाची संघटना आहे. शेतीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी देखील अनेक संघटना अनेक राज्यात आहेत. पण मला सांगताना आनंद होतो की, आपली एकमेव संघटना आहे की ६० वर्षांपासून आपण भेटतो. आपल्या अडचणी नवे शोध केंद्र आणि राज्य सरकारला सांगतो. संशोधनासाठी आपली संघटना सतत जागरूक असते.

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनाही अनुदान मिळालं पाहिजे राज्य सरकारने आढावा घेतला पाहिजे. एकुण क्षेत्र किती आणि पीक किती आहे याची सरकारने नोंद घेणे आवश्यक आहे. त्या नोंदीमुळे अनेक कामांना मार्ग मोकळा होईल. पावसाने या पिकांचे नुकसान होतं त्याचा सुद्धा आढावा सरकारनं घेतला पाहिजे.

अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावं लागेल. राज्य सरकारनं द्राक्ष पिकाचं नुकसान झाल्यावर कमीत कमी ५० टक्के अनुदान देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.