Gurupaurnima : प्रसन्नतेच्या वातावरणात कलापिनीची ‘गुरुवंदना’ संपन्न

एमपीसी न्यूज : यंदाची कलापिनीची (Gurupaurnima) गुरुपौर्णिमा…’गुरुवंदना’ अतिशय उत्साहात साजरी झाली. कै.पुष्पलता अरोरा स्मृती पुष्प म्हणून दरवर्षी कलापिनीच्या वतीने ‘गुरुवंदना’ साजरी करण्यात येते. याच समारंभात कलापिनी कुमार भवनचा वर्धापन दिन देखील साजरा केला जातो.

‘गुरूने दिला ज्ञानरुपी वसा’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि वातावरण प्रसन्न झाले. धनश्री शिंदे हिने गायन सादर केले. समीर महाजन यांनी तबल्याची साथ दिली, तर ओंकार बोराडे यांनी (संवादिनी) सुरेल साथ दिली. कुमार भवनच्या मुलांनी विपुल परदेशी, ऋषीकेश कठाडे, आणि नमन शिरोळकर यांनी बसवलेले गणेशवंदना नृत्य सादर झाले. कार्यक्रमात कुमार भवनच्या विद्यार्थ्यांनी ‘माझे गुरू’ (दिग्दर्शन सागर यादव), ‘हे श्रम देवी कृपा करी’ (दिग्दर्शन डॉ.विनया केसकर) त्याचप्रमाणे ‘धीर आणि धैर्य’ (संदीप मन्वरे) अतिशय सुंदर आणि बोध देणाऱ्या नाटिका सादर केल्या.

दरवर्षी प्रमाणे या (Gurupaurnima) वर्षीही कार्यक्रमात शैक्षणिक यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने प्रतिनिधीक स्वरूपात डॉ. श्रद्धा गद्रे हिने उत्स्फूर्तपणे आपले मनोगत व्यक्त केले. आणि लहानपणापासून अनेक गोष्टी कलापिनीमुळे शिकायला मिळाल्या..तसेच घरचे कौतुक खूप समाधान देते असे मनोगतात म्हंटले. तसेच, कुमारभवनमधील शांभवी जाधव हिने आपल्या मनोगतात कुमार भवनमध्ये येण्याने नवीन मित्र-मैत्रिणी मिळतात. नाटक, नृत्य आणि आता गायन यांचे शिक्षण एकाच ठिकाणी मिळत असल्याने आत्मविश्वास येतो असे सांगितले.

या प्रसंगी कार्यक्रमाला माळेगाव आश्रम शाळेतील मुख्याध्यापिका प्रा. प्रमिला भालके या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कलापिनीचे कार्य पाहून भारावून जात त्यांनी संस्थेत वेळ मिळेल तसा सामील होण्यास आवडेल अशी इच्छा व्यक्त केली. कुमार भवनच्या मुलांना त्यांनी आश्रम शाळा बघण्यासाठी आमंत्रण दिले. कार्याध्यक्ष आणि कुमार भवन प्रमुख अंजली सहस्त्रबुद्धे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी कुमार भवनच्या वाटचालीविषयी व उपक्रमांविषयी माहिती दिली व आता कुमार भवनसाठी संपदा थिटे, विद्या अडसुळे, चेतन पंडित, शार्दुल गद्रे, डॉ.विनया केसकर, प्रतीक मेहता या सगळ्यांचे सहकार्य कुमार भवनला मिळणार आहे असे सांगितले.

संस्थेचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे यांनी आता सुरू असलेल्या उपक्रमांना आणि भविष्यातील पुढील उपक्रमांना अनेक शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष विनायक अभ्यंकर यांनी कलापिनीचा बांधकाम प्रकल्प लवकरच पूर्णत्वाला जाईल अशी ग्वाही दिली. स्वाती शेटे यांनी सत्कार्थीना पुस्तकं भेट म्हणून दिली. या समारंभाला कलापिनीचे खजिनदार श्रीशैल गद्रे, उपाध्यक्ष अशोक बकरे आदी मान्यवर उपस्थित होते. बालभवन प्रमुख मधुवंती रानडे यांनी उत्तम सूत्रसंचालन केले. कलापिनीचा युवा कलाकार चेतन पंडित याला पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र येथे अभिनय प्रशिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल गौरविण्यात आले.

तसेच, चैतन्य जोशी याने (Gurupaurnima) योग पारंगत ही पदवी मिळवल्या बद्दल गौरविण्यात आले. याप्रसंगी कलापिनीच्या दोन नवीन एकांकिका ‘फसला माधव कुणीकडे’ आणि ‘विठाई’ यांचा मुहूर्त करण्यात आला. अनुक्रमे मनोज काटदरे आणि सायली रौंधळ या एकांकिकेचे दिग्दर्शन करणार आहेत. सायली रौंधळ हिने राज्य नाट्य स्पर्धेत प्राथमिक आणि अंतिम फेरीत २ रौप्य पदके मिळवली असून त्याबद्दल तिचा गौरव करण्यात आला. लवकरच या दोन्ही एकांकिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

प्रतीक मेहता, शार्दूल गद्रे, स्वच्छंद, धनश्री वैद्य, आदिती आपटे या युवक कलाकारांनी या कार्यक्रमाचे उत्तम संयोजन केले. कुमार भवनचे प्रशिक्षक संदीप मनवरे यांनी आभार मानले. कुमार भवनच्या या 6 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व पालक वर्ग आणि सभासद या प्रसंगी आवर्जून उपस्थित होते. 1 ऑगस्ट 2022 पासून कुमार भवनमध्ये आपण ‘कुमार नाट्य अभ्यासक्रम’ सुरू करत आहोत. त्यामुळे 5 वी ते 10 वीच्या मुलांनी 31 जुलैपर्यंत प्रवेश घ्यावा, असे आवाहन कुमार भवन प्रशिक्षकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.