Chakan : गुटख्याच्या गोडाऊनवर छापा; 14 लाखांचा गुटखा जप्त

पिंपरी - चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई

एमपीसी न्यूज – गुटख्याच्या गोडाऊनवर छापा टाकून 14 लाख 24 हजार 337 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने चाकण येथील मेदनकरवाडी येथे केली. या कारवाईमध्ये एकाला अटक करण्यात आली.

अंकित सुनिल गुप्ता (रा. मेदनकरवाडी, चाकण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अंकित गुप्ता हा दोन टेम्पोमधून रात्रीच्यावेळी गुटख्याची वाहतूक करणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अंकित याला गुटख्याच्या टेम्पोसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने चाकण मेदनकरवाडी येथे एका गोडाऊनमध्ये गुटख्याचा साठा करून ठेवला असल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी गोडाऊनवर छापा टाकला. यामध्ये पान मसाला, राज कोल्हापुरी, विमल पान मसाला, आरएमडी, सुगंधी तंबाखू असा एकूण 14 लाख 24 हजार 337 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला पुढील कारवाईसाठी चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, सहायक पोलीस फौजदार रमेश नाळे, पोलीस हवालदार अजय भोसले, किरण लांडगे, दिपक खरात, प्रमोद वेताळ, पोलीस नाईक सचिन उगले, अमित गायकवाड, पोलीस शिपाई गणेश सावंत, प्रविण पाटील, स्वप्निल शिंदे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.