Hinjawadi : मावळच्या नायब तहसीलदारासह तलाठ्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

1997 साली केली सातबाऱ्यावर चुकीची नोंद

एमपीसी न्यूज – मूळ कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून सातबाऱ्यावर चुकीची नोंद केली. फिर्यादी निम्न जातीतील असल्याने तेरा वर्षांपासून त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. याप्रकरणी मावळचे तत्कालीन नायब तहसीलदार आणि तलाठ्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. 6) हिंजवडी पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

नायब तहसीलदार एन. बी. धनगर, गावकामगार तलाठी स. न. खिरीड आणि यशवंत सावंत (रा. भोईर कॉलनी, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शशिकांत विश्वनाथ भोसले (वय 53, रा. येरवडा) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोसले यांनी सन 1997 साली हिंजवडी येथे पावणेसात गुंठे जमीन खरेदी केली. त्यावेळी तत्कालीन तलाठी खिरीड यांनी भोसले यांची सातबारा उता-यावर नोंद न घेता राहुल वाघमारे यांच्या पूर्वीच्या अर्जामध्ये खाडाखोड करून हरकत दर्शिवली. तसेच, नायब तहसीलदार धनगर यांनी त्या अर्जाच्या आधारे भोसले यांची बाजू विचारात न घेता आरोपी सावंत याच्या बाजूने निर्णय दिला.

त्यानुसार सातबाऱ्यावर सावंत यांची नोंद करण्यात आली. या निर्णयाविरोधात भोसले यांनी आक्षेप नोंदवला असतानाही मागील तेरा वर्षांपासून त्यावर निर्णय होत नसल्याने त्यांनी पोलिसात धाव घेतली. भोसले हे निम्न जातीतील तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्याने त्यांची दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यानुसार आरोपींवर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.