Hinjawadi : ओएलएक्स वर कार विकण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ओएलएक्स वर कार विकण्याची जाहिरात देऊन एका व्यावसायिकाची तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार बावधन येथे घडला. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवार (दि. 17) ते शुक्रवार (दि. 21) दरम्यान बावधन येथे घडला.

किशोर जनार्दन बकरे (वय 49, रा. आदित्य शगुन सोसायटी, बावधन) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार डॉ. रोहित उचिल, महेश कुमार आणि असित मलिक (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बकरे बावधन येथे क्रेनचा व्यवसाय करतात. त्यांना चारचाकी कार घ्यायची होती. त्याबाबत त्यांनी ओएलएक्स वर चौकशी केली. त्यावेळी त्यांना महेश कुमार आणि डॉ. रोहित उचिल यांना त्यांची हुंदाई क्रेटा (एम एच 46 / बी ए 0527) ही कार विकायची असल्याची जाहिरात दिसली. त्यांनी त्याबाबत माहिती काढून महेश आणि रोहित यांच्याशी संपर्क केला. महेश आणि रोहित यांनी बकरे यांना विश्वासात घेऊन त्यांना असित मलिक याच्या स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या खात्यावर तीन लाख 17 हजार 800 रुपये भरण्यास सांगितले. बकरे यांनी संपूर्ण रक्कम बँक खात्यावर भरली, मात्र आरोपींनी कार बकरे यांना दिली नाही. यावरून आपली फसवणूक झाली असल्याचे समजताच त्यांनी तात्काळ हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपींवर भारतीय दंड संहिता कायदा कलम 420 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (सी) आणि 66 (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.