Lonavala : भांगरवाडीत बंद फ्लॅटमध्ये चोरी; सव्वालाखाचा ऐवज लंपास

House break-in reported in Bhangarwadi area of Lonavala today, gold ornaments and cash worth Rs 1.19 lakhs stolen.

एमपीसी न्यूज : भांगरवाडी येथिल गोखलेपार्क सोसायटीमधील बंद फ्लॅट व गणेशकृपा बिल्डिंगमध्ये चोरट्यांनी हात साफ करत 1 लाख 21 हजारांचा ऐवज व रोख रक्कम लंपास केली.

काजल भाऊ पिंपळे (वय 25, रा. गोखलेपार्क सोसायटी, शितळादेवी मंदिर भांगरवाडी, लोणावळा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार (दि.10) रोजी पहाटे 1.30 ते 3 वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी गोखलेपार्क सोसायटीमधील तळमजल्यावर असलेल्या पिंपळे यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला.

त्यानंतर कपाटातील 12 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मिनी गंठण, 4 ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेल, 3 ग्रॅम वजनाची अंगठी, 3 ग्रॅम वजनाची लहान मुलाची चैन, दोन सोन्याच्या बाळ्या, लहान मुलाचे पायातील चांदीचे पैंजन व 20 हजार रुपये रोख, असा 1 लाख 19 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.

तसेच भांगरवाडी येथील गणेशकृपा बिल्डिंगमधील श्रीराम गोविंद पंडित यांच्या घरातील दोन हजार रुपये किंमतीची चांदीची वाटी पळवली. यासह रचना गार्डन सोसायटीमध्ये देखिल चोरीचा प्रयत्न केला.

याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.