Pune News : डेटिंग ॲपवरून ओळख, 42 वर्षीय उच्चशिक्षित महिलेची सात लाख रुपयांनी फसवणूक

एमपीसी न्यूज : पुण्यातील एका उच्च शिक्षित डॉक्टर असल्याचे भासवून महिलेची सात लाख रुपयांनी फसवणूक केली. विशेष म्हणजे आरोपींची आणि या महिलेची ओळख एका डेटिंग ॲप वरून झाली होती. त्यातील आरोपीने डॉक्टर असल्याचे भासवून आणि परदेशी चलन सीमा शुल्क विभागाकडून सोडविण्याचे कारण सांगत महिलेचे सात लाख रुपये लुबाडले. येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अजय नाथन व इतर पाच जणांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 42 वर्षीय महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. ही घटना जून ते ऑगस्ट 2021 या कालावधीत घडली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, वडगावशेरी परिसरात राहणाऱ्या फिर्यादी महिलेची काही दिवसांपूर्वी एका डेटिंग ॲप वरून अजय नाथन त्याच्या सोबत ओळख झाली होती. अजय नाथन याने फिर्यादीला डॉक्टर असल्याचे सांगितले आणि सध्या जर्मनीमध्ये राहत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर या दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाली आरोपीने फिर्यादीला लग्न करण्याचे आमिष दाखवले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याने फिर्यादीला दिल्ली येथे दोन लाख अमेरिकन डॉलर घेऊन लग्न करण्यासाठी भारतात आलो असल्याचे सांगितले. परंतु परदेशी चलन असल्याने सीमा शुल्क विभागाने त्याला अडवल्याचे सांगितले.

या ठिकाणी काही पैशांची गरज असल्याचे सांगून त्यांनी या महिलेकडून वेगवेगळी कारणे सांगून तब्बल सात लाख आठ हजार रुपये घेतले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या महिलेने सायबर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.