Pune : राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

गांधीजींचे विचार वैश्विक कल्याणाचे : श्रीनिवास पाटील

एमपीसी न्यूज : ‘ मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला अशा अनेक जागतिक नेत्यांनी, लढा देण्यासाठी गांधी विचारातून प्रेरणा घेतली कारण गांधीजींचे विचार मानवतेच्या कल्याणाचे, चिरंतन आणि वैश्विक आहेत. म्हणून गांधीजींच्या कार्याची प्रेरणा घेण्यासाठी गांधी सप्ताहासारखे उपक्रम महत्वाचे आहेत’, असे मत सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे’ सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी श्रीनिवास पाटील बोलत होते.

गांधी सप्ताहाचे हे नववे वर्ष होते. उद्घाटन १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी गांधी भवन, कोथरुड येथे झाले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.पी.ए. इनामदार उपस्थित होते.

प्रारंभी राज्यघटनेच्या प्रास्ताविकेला अभिवादन करण्यात आले आणि वाचन करण्यात आले. तसेच सर्वधर्मीय धर्मगुरूंनी प्रार्थना सादर केल्या.

संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. अन्वर राजन यांनी प्रास्ताविक केले. महात्मा गांधी यांचा विचार गणेशोत्सवात मांडणाऱ्या मंडळांचे प्रतिनिधी उदय जगताप, रवींद्र माळवदकर यांचा सत्कार करण्यात आला. या मंडळांना अनुक्रमे २५ हजार, ३५ हजार पारितोषिक देण्यात आले.

यावेळी बोलताना श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘गांधीजींनी वर्ण विद्वेषाविरूद्ध, जातीयतेविरुद्ध आणि शेतकऱ्याच्या अन्यायाविरुद्ध लढा देऊन जीवन कार्याला सुरुवात केली. वृत्तपत्रे, प्रबोधनाच्या मार्गाने लढा दिला. गरिबी निर्मूलनाचा ध्यास घेतला.’

‘महात्मा गांधींना अर्धनग्न फकीर म्हटले जाते, त्यांनी नौआखालीत आणि नेहमीच  जातीय दंगा शमविण्यासाठी प्राणाची बाजी लावली.’असे मत श्रीनिवास पाटील यांनी केले.

ज्या मार्गांना महात्मा गांधी मार्ग नाव दिले आहे, त्याचा पूर्ण उच्चार करून प्रेरणादायक स्मरण करावे. मात्र, एम.जी. रोड असा उच्चार करू नये, असेही त्यांनी सुचवले.

डॉ.पी. ए. इनामदार म्हणाले, ‘ अध्यापनाचे शिक्षण घेणाऱ्या भावी शिक्षकांना महात्मा गांधींचे तत्वज्ञान शिकविण्यासाठी महाराष्ट्र स्मारक निधीला मदत करू.’

अध्यक्षीय समारोप करताना डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘महात्मा गांधी कधीही कालबाह्य होणार नाहीत, कारण प्रत्येक नवी पिढी त्यांचे विचार पुढे नेत आहे. पर नाश, आत्मनाश करताना सृष्टीचा नाश करण्याची विकृती दिसत असताना गांधी विचार ही विकृती काढण्याचा मार्ग दाखवत आला आहे. हिंसेचे उदात्तीकरण केले तर जगच शिल्लक राहणार नाही. नश्वराची पूजा होता कामा नये, शाश्वताची पूजा झाली पाहिजे. शाश्वताचा शोध घेत, आत्मपरीक्षण करीत मोहनदास गांधी यांचा प्रवास महात्मा होण्यापर्यंत झाला. या निमित्ताने बा- बापू दोघांचेही स्मरण केले पाहिजे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.