Chakan Crime News : दगड माती टाकून रस्ता अडवला; रस्त्यावरील दगड माती बाजूला करणाऱ्या दांपत्यास ठार मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – तिघांनी मिळून जेसीबीच्या सहाय्याने वहिवाटीचा रस्ता खोदून मोठमोठे दगड आणि मातीचे ढिगारे घालून रस्ता अडवला. त्यामुळे एका दाम्पत्याने रस्त्यावरील दगड आणि माती बाजूला करण्याचा प्रयत्न केला. याबाबत तिघांनी दांपत्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना कासारी गावठाण येथे घडली.

राम लक्ष्मण होले, सोमनाथ बाळू होले, दत्तात्रय सखाराम होले (सर्व रा. कासारी, ति. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पाच जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या येण्या-जाण्याचा वहिवाटीचा रस्ता जेसीबीच्या सहाय्याने खोदून मोठमोठे दगड व मातीचे ढिगारे घातले. त्यानंतर जेसीबी मशीन रोडवर आडवी लावून रस्ता बंद केला. याबाबत फिर्यादी आणि गावातील शेतकरी यांनी आरोपींना समजावून सांगितले. तरी देखील आरोपींनी रस्ता मोकळा केला नाही.

त्यामुळे फिर्यादी आणि त्यांचे पती यांनी शनिवारी (दि. 9) रात्री सात वाजताच्या सुमारास रस्त्यावरील दगड व मातीचे ढिगारे लोकांना अडथळा होऊ नये म्हणून काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या पतीला धक्का दिला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.