IND VS AUS : कोहलीच्या विराट शतकाने भारत मजबूत स्थितीत

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) तब्बल सव्वा तीन वर्षे (1205 दिवस) 24 कसोटी सामने आणि 42 डावाच्या मोठ्याच (IND VS AUS) कालावधीनंतर आलेल्या कोहलीच्या 28 व्या कसोटी शतकामुळे अहमदाबाद कसोटी सामन्यात भारतीय संघ एकदम मजबूत स्थितीत आलेला आहे, आजच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा भारतीय संघाने घेतलेल्या 91 धावांच्या महत्वपूर्ण आघाडीला तोंड देताना ऑस्ट्रेलियन संघाने आपल्या दुसऱ्या डावात बिनबाद 3 धावा केल्या आहेत. भारतीय संघ अजूनही 88 धावांची आघाडी ठेवून या सामन्यात मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहे. 

त्याआधी कालच्या तीन बाद 289 या धावसंख्येवरून आजच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेंव्हा कालची नाबाद जोडी विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी सावध सुरुवात केली खरी पण चांगले खेळत असतानाच जडेजाची एकाग्रता अचानक खराब झाली आणि तो अतिशय खराब फटका मारून बाद झाला तेंव्हा टीव्हीवर समालोचन करणारे महान समालोचक आणि भारताचे माजी महान विक्रमवीर सुनील गावसकर चांगलेच भडकले होते, कारण या मैदानावर एकदा जम बसला म्हणजे मोठी खेळी होणारच होणार अशीच परिस्थिती होती.

ख्वाजा, ग्रीन,गील,कोहलीने ते सोदाहरण सिद्ध करून दाखवलेच की.जडेजाने 28 धावा करताना कोहलीसोबत 64 धावांची भागीदारी रचली होती. त्याला मर्फीने बाद केले,त्यानंतर खेळायला आला तो कोडा भरत, श्रेयस अय्यरची पाठदुखी पुन्हा उफाळून आल्याने भरतला बढती मिळाली आणि त्याने त्या संधीचे सोने करणारी खेळी करुन दाखवली,त्याचे पहिलेवहीले अर्धशतक केवळ सहा धावांनी हुकले असले तरी त्याने कोहलीसोबत 84 धावांची महत्वपूर्ण भागीदारी करून दाखवतानाच अतिशय उत्तम अशी खेळीही केली.

तो आपले पहिले अर्धशतक पूर्ण करत आहे असे वाटत असतानाच लायनच्या एका चांगल्या चेंडूवर तो चकला आणि चेंडू त्याच्या बॅटची कड घेत हँडस्कोंबच्या हातात विसावला.त्याची खेळी छोटी असली तरी लक्षात राहील अशीच होती अन त्यामुळेच कोहलीवर फारसे दडपण आले नाही. आज कोहलीने जबरदस्त मनोनिग्रह दाखवत एक महान खेळी करत आपल्या कसोटीतल्या शतकाला लागलेले सव्वातीन वर्षांहुन अधिक काळाचे ग्रहण समाप्त केले.

PMPML : पीएमपीएमएलची सेवा भविष्यात खंडित होणार नाही – पालकमंत्री

हे शतक त्याच्या इतर शतकाइतके वेगवान आकर्षक नसले तरी ते इतर शतकाइतके महान आणि अविस्मरणीय नक्कीच आहे. हे त्याचे कसोटीतले एकूण 28 वे, ऑस्ट्रेलियन संघांविरुद्धचे सर्व फॉरमॅटमधले 16वे (कसोटीतले 8वे)आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले एकूण 75 वे शतक ठरले. हे विक्रमी शतक ठोकत त्याने विक्रमाच्या यादीत आपले नाव दुसऱ्या क्रमांकावर आणले.

एक नंबरवर आजही विराजमान आहे द सचिन तेंडुलकर(एकूण 20 शतके),हे शतक जवळपास सव्वा तीन वर्षांनी आले,त्याने त्याला असंख्य टिकेला सामोरे जावे लागले, त्या सर्वांना बॅटने उत्तर देत कोहलीने आज मोठी लोकं तोंडाने नाही तर फक्त आपल्या कर्तृत्वानेच बोलतात हे सिद्ध करुन दाखवले आहे,भारतातल्या आपल्या 50 व्या कसोटीतले हे त्याचे शतक म्हणून सर्वार्थाने खास आहे,एरवी चौकार,षटकारांची आतषबाजी करणाऱ्या कोहलीच्या आजच्या शतकात फक्त 5 चौकार सामील होते.

विराटने शतक पूर्ण केल्यानंतरही आपल्या एकाग्रतेत भंग पडू दिला नाही, म्हणूनच त्याने त्याच निर्धाराने खेळत आपले 8 वे दीडशतक पूर्ण केले. या बाबतीतही त्याच्या पुढे आता फक्त सचिन आहे,सचीनने 9 वेळा कसोटीत 150 वा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.

त्याला अक्षरनेही उत्तम साथ देत संघाला आघाडी मिळवून दिली,अन त्यानंतर थोड्याच वेळात एकूण चौथे आणि या मालिकेतले आपले तिसरे अर्धशतक पूर्ण करुन संघाला आणखी एक नवीन अष्टपैलू मिळाला आहे,असेच जणू सांगत दिलासा दिला. खरेतर त्याचे मुख्य काम आहे गोलंदाजी,पण दुर्दैवाने त्याला या मालिकेत तितकी गोलंदाजीही मिळाली नाही, जितकी जडेजा वा अश्विनला मिळाली ना त्याला जी मिळाली त्यात फारसी चमक दाखवता आली नाही, पण फलंदाजीतल्या या चांगल्या कामगीरीमुळे त्याला आता गोलंदाजीतही कर्णधार विश्वासपात्र समजेल अशी आशा बाळगू या.

अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर अक्षरने आक्रमक अंदाज दाखवत जबरदस्त टोलेबाजी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चांगलेच बेजार केले.या आधी दोन वेळा तो शतकाजवळ येवूनही ते पुर्ण करण्यात यशस्वी ठरला नव्हता, आज तरी तो ती ऐतिहासिक कामगिरी करेल अशी आशा वाटत असतानाच तो 79 धावावर असताना स्टार्कच्या गोलंदाजीवर साफ चकला आणि त्रिफळाबाद झाला.

त्यावेळी त्याच्या आणि कोहलीच्या चेहऱ्यावर दिसलेली निराशा सर्व काही सांगून गेली. अक्षरने 5 चौकार आणि चार उत्तुंग षटकार मारत 112 चेंडूत 79 महत्वपूर्ण धावा केल्या,ज्याने भारताला आघाडीही मिळवून दिली,त्याचसोबत त्याने कोहलीसोबत 6 व्या गडयासाठी 162 धावांची विशाल भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत आणून ठेवले आहे.अक्षर नंतर आलेले अश्विन आणि उमेश स्वस्तात बाद झाल्याने विराटला द्विशतकाजवळ आल्यानंतर साथ द्यायला फक्त शमीच उरला होता, कारण श्रेयस फलंदाजीसाठी येवू शकणार नव्हता.

त्यामुळे कोहलीने वेगवान फलंदाजी करण्याचे ठरवले पण या प्रयत्नात त्याला काही यश आले नाही आणि तो 186 धावांवर असताना मर्फीच्या गोलंदाजीवर सीमारेषाजवळ झेलबाद झाला. पण त्या आधी त्याने एक महान खेळी करुन संघाला सुस्थितीत तर आणुन ठेवलेच पण आपल्या बॅटला लागेलेलं ग्रहणही समाप्त करत आपल्या दर्जाची पुन्हा एकदा सगळ्यांना प्रचिती दाखवली आहे.

कदाचित अश्विनने जराशा संयम दाखवला असता तर कोहलीला आपले मायदेशातल्या कसोटीतल्या 7 व्या शतकाला पूर्ण करुन महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्यासोबत आपले नाव जोडता आले असतेही, पण क्रिकेटमध्ये जर तरलाकाहीही अर्थ नसतो हेच खरे, पण कोहली बाद होवून तंबूत परतत असताना ऑस्ट्रेलियन संघातील प्रत्येक खेळाडूंसह मैदानावरील तमाम प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करत त्याला मानवंदना देत या महान खेळीच कौतुक केले.

त्याच्याच खेळीमुळे भारतीय संघाला पहिल्या डावात 91 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली, ज्याला तोंड देताना ऑस्ट्रेलियन संघांने आपल्या दुसऱ्या डावात पहिल्या डावातील शतकवीर उस्मान ख्वाजाला क्षेत्ररक्षण करताना झालेल्या दुखापतीमुळे हेडची साथ देण्यासाठी कुनेमनला फलंदाजीसाठी पाठवले.अश्विनने त्याला जवळजवळ चकवलेच होते,पण भरतला तो झेल घेण्यात अपयश आले आणि ऑस्ट्रेलियन संघाने आजची आपली दहा षटके निर्विघ्नपणे खेळून काढत तीन धावा केल्या आहेत, अजूनही भारतीय संघाकडे 88 धावांची मोठी आघाडी शिल्लक आहे.

एकंदरीत या खेळपट्टीचे स्वरूप बघता हो कसोटी निकाली होण्याची शक्यता आता धूसर होत चालली असली तरी क्रिकेट हा खेळ अनिश्चितता असलेला असल्याने उदया भारतीय फिरकी काही चमत्कार करु शकते का हे बघणे मनोरंजक ठरेल.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया
पहिला डाव सर्व बाद480
भारत
पहिला डाव 9 बाद 571
जडेजा 28,भरत 44 ,अक्षर 79 कोहली 186
लायन 151/3,मर्फी 113/3
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव
बिनबाद 3
हेड नाबाद 3

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.