IND vs AUS 4th Test : गीलच्या शानदार शतकाने भारताची आश्वासक पण शुभ सुरूवात

एमपीसी न्यूज : युवा पण अतिशय प्रतिभावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुभमन गीलने आज खतरनाक ऑस्ट्रेलियन गोलंदाजीविरुद्ध शानदार खेळत भारतातले आपले पहिले आणि कसोटी कारकिर्दीतल्या दुसऱ्या शतकामुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाच्या (IND vs AUS 4th Test)  मोठ्या धावसंख्येला उत्तर देताना आश्वासक सुरूवात केली आहे.आजच्या तिसऱ्या दिवशीचा खेळ समाप्त झाला तेंव्हा भारतीय संघाच्या तीन बाद 289 धावा झालेल्या असून अजूनही ऑस्ट्रेलियन संघ 191 धावांची आघाडीवर आहे.

कालच्या नाबाद 34 वरुन आज खेळ सुरू करताना कर्णधार रोहित आणि शुभमन गील या जोडीने चांगली सुरुवात केली. दोघेही चांगल्या चेंडूला योग्य तो सन्मान देत होते त्याचवेळी खराब चेंडू मिळाला तर त्याचा योग्य तो समाचार पण घेत होते. ही जोडी जोरदार सुरुवात करुन देईल असे वाटत असतानाच कर्णधार रोहित एक अतिशय खराब फटका मारून वैयक्तीक 35 धावांवर असताना लाबूशेनच्या हातात झेल देवून कुनेमनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला,यावेळी भारतीय संघाची धावसंख्या 1 बाद 73 अशी होती.रोहित चांगलाच स्थिरावला होता, पण त्याने अतिशय खराब फटका मारून स्वतःच्या हाताने स्वतःच्याच पायावर कुर्हाड मारून घेतली.

यानंतर खेळायला आला तो चेतेश्वर पुजारा. त्याने शुभमन गीलला उत्तम साथ देत भारतीय लढा पुढे चालूच ठेवला.पुजाराने आजही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा उत्तम सामना  करत त्यांच्याविरुध्द  आपले वर्चस्व गाजवले.त्याने आज याच संघांविरुद्ध कसोटीतल्या आपल्या वैयक्तिक 2000 धावा पूर्ण केल्या. (IND vs AUS4th Test) ही जोडी संयमासोबतच आक्रमक खेळ करत होती. बघताबघता या जोडीने आधी अर्धशतकी तर नंतर शतकी भागीदारी करुन भारतीय संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. पुजारा नेहमीपेक्षा आक्रमक खेळत होता तर शुभमन गील आपल्या नैसर्गिक शैलीत आकर्षक खेळत होता. त्याने उपहारानंतर आपले वैयक्तिक दुसरे आणि भारतीय भूमीवरील दुसरे कसोटी शतक पूर्ण करून आपल्याला संघा बाहेर बसवून राहुलला अंतिम 11 त खेळवण्याचा निर्णय संघाच्या हिताचा नव्हता हेच सिद्ध केले.

Pune News : कसबा पोटनिवडणुकीतील पराभवाचं आम्ही पोस्टमार्टम केलं : देवेंद्र फडणवीस 

या जोडीने 113 धावांची शतकी भागीदारी केली असतानाच पुजारा वैयक्तिक 42 धावांवर असताना मर्फीच्या गोलंदाजीवर चकला आणि स्थिर झालेला असतानाच पायचीत झाला.भारतीय संघासाठी हा मोठाच धक्का होता, कारण अजूनही भारतीय संघ आपला फॉलोऑन टाळण्यात 100 च्या आसपासच्या धावसंख्येच्या फरकाने पिछाडीवर होता. यानंतर खेळायला आला तो विराट कोहली.त्याने आज भारतातली आपली 50 वी कसोटी खेळतानाच भारतातल्या कसोटीतल्या आपल्या 4000 धावाही पूर्ण केल्या.अहमदाबादचे मैदान आणि विक्रमाचे नाते पूर्वीपासूनच खास असे आहे ,येथेच सुनील गावस्कर यांनी  सर्वप्रथम  कसोटीतल्या 10000 धावांच्या एव्हरेस्टवर पाऊल ठेवले होते,तर येथेच कपिल देव यांनी  सर रिचर्ड हँडली यांच्या 431 बळीच्या विक्रमाला नेस्तनाबूत करून तो विक्रम आपल्या नावावर केला होता.

कोहलीने मागील काही एकदिवशीय सामन्यात जरी आपल्या शतकांचा दुष्काळ संपवला असला तरी कसोटी सामन्यात मात्र त्याला अजूनही तो दुष्काळ संपवता आलेला नाही,आज मात्र त्याने अतिशय निर्धारपुर्वक खेळ करत त्या दुष्काळाला खतम करण्याच्या दृष्टीनेच बॅट चालवली आहे,त्याने बघताबघता आपले वैयक्तिक 29 वे अर्धशतक पूर्ण करत ती गोष्टही साध्य करण्याचाच आपला हेतू जाहीर केला आहे, (IND vs AUS 4th Test Match) एकंदरीतच ही कसोटी कोहलीसाठी आज तरी संसमरणीय झाली आहे.त्याने गीलसोबत तिसऱ्या गड्यासाठी 58 धावांची भागीदारी करुन भारतीय संघाला दमदार सुरुवात करून देण्यात मोठाच वाटा उचलला.दुसऱ्या बाजुने गीलही उत्तम खेळत असतानाच लायनच्या एका सुंदर चेंडूवर आपली एकाग्रता गमावून बसला आणि वैयक्तिक 128 धावा करून पायचीत झाला.

लायनने आज गीलला बाद करून भारताविरुद्धचाआपला 54 वा बळी मिळवत महान इंग्लिश गोलंदाज डेरेक अंडरवुड यांच्याबरोबर आपले नाव क्रिकेटच्या इतिहासात अजरामर केले आहे.गील बाद झाल्यानंतर आजही संघ व्यवस्थापणाने श्रेयस अय्यर ऐवजी जडेजाला फलंदाजीसाठी बढती देत सर्वांनाच पुन्हा एकदा आश्चर्यचकित केले.जडेजा आणि कोहलीने आजच्या दिवसातल्या उर्वरित खेळात संघाला 280 च्या त्या टप्प्याला पार करत संघाला आश्वस्त केले, त्यामुळेच आजच्या दिवसाचा खेळ समाप्त झाला तेंव्हा भारतीय संघ तीन बाद 289 अशा समाधानकारक स्थितीत आला.

सामन्याचे अजुन दोन दिवस बाकी आहेत आणि अजूनही दोन्ही संघाचे पहिलेच डाव चालू असल्याने हा कसोटी सामना कुठल्या दिशेने चालला आहे,हे चाणाक्ष क्रिकेटरसिकांच्या लक्षात आलेले असेलच. उद्या जर भारतीय संघ आक्रमक खेळून आणखी साडेतीनशे धावा करु शकला तरच (IND vs AUS 4 th Test Match) भारतीय संघ विजयाच्या मार्गावर दिसेल, तर त्याचेवळी ऑस्ट्रेलियन संघाचा भारतीय संघाला कमीत कमी धावसंख्येत गुंडाळण्याचा प्रयत्न असेल,यात कोण यशस्वी होते ते मात्र उद्याच कळेल,नाही का?

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया 

पहिला डाव सर्वबाद 480

भारत 

पहिला डाव 3 बाद 289

गील 122,पुजारा 42,रोहित 35,कोहली नाबाद 59,जडेजा नाबाद 16

लायन 75/1,मर्फी 45/1,कुनेमन 43/1

 

विवेक कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.