Ind Vs Eng Test Series : भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा थरार आज पासून 

एमपीसी न्यूज – ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात 2-1 अशी मात दिल्यानंतर भारत आणि इंग्लंड दरम्यान चार कसोटी सामन्यांची मालिका आजपासून सुरू होत आहे. संघात अनुभवी खेळाडूंचा समावेश आणि तगडे पर्याय उपलब्ध असल्याने भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आपल्या देशात संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्व क्रिडा रसिकांचे लक्ष लागून राहिले आहे. 

भारत आणि इंग्लंड दरम्यान चार कसोटी, पाच T20 व तीन एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. चार कसोटी सामन्यांपैकी दोन सामने चेन्नईत तर, दोन सामने अहमदाबाद येथे खेळले जाणार आहेत. भारतीय संघाची धुरा विराट कोहली कडे आहे तर, इंग्लंडचा संघ जो रुटच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. दोन्ही संघ चांगल्या लयीत असून विजयी घोडदौड कायम राखण्याचे आवाहन दोघांसमोर आहे. भारताने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवला आहे तर, इंग्लंडने श्रीलंकेवर मात केली आहे.

इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुट जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने श्रीलंका विरोधात एक द्विशतक आणि एक 186 धावांची शतकी खेळी केली आहे. त्याने संपूर्ण सिरिज मध्ये 426 धावा कुठल्या आहेत. याशिवाय क्रिस वोक्स, जोस बटलर, बेन स्टोक्स, मोईन आली, जेम्स एंडरसन, जोफ्रा आर्चर आणि स्ट्युअर्ट ब्रॉड यांचा संघात समावेश आहे. फलंदाज आणि गोलंदाज यांची मजबूत फळी इंग्लंड कडे आहे.

भारतीय संघ देखील अतिशय मजबूत स्थितीत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय खेळाडूंना दुखापतग्रस्त झाल्यानं मोठी अडचण झाली होती. संघाची फलंदाजीची धुरा रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या वर आहे. याशिवाय केएल राहुल, मयंक अग्रवाल यांचा देखील समावेश आहे पण त्यांना अंतिम अकरा मध्ये स्थान मिळण्यासाठी वाट पहावी लागेल. जलदगती गोलंदाजीत इशांत शर्मा, बुमराह, सिराज, हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकूर तर, आश्विन, कुलदिप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर हे फिरकी गोलंदाज आहेत.

दरम्यान, अक्षर पटेलला पहिल्या सामन्यासाठी संघातून वगळण्यात आले आहे. त्याठिकाणी फिरकीपटू शाबाज नदिम आणि दिपक चहर यांना संघात स्थान देण्यात आले आहे. इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुट याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.