Pune News : रेशन अन्न धान्य वितरण भ्रष्टाचाराची चौकशी करा ; लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन  

Investigate corruption in the distribution of ration food grains; Statement to the Collector by Lok Janshakti Party.

एमपीसी न्यूज – प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत केंद्रसरकार कडून आलेल्या मोफत धान्न्याचा काळा बाजार करणाऱ्या शासकीय कर्मचारी आणि रेशन दुकानदारांची निपःक्षपाती चौकशी पोलीस यंत्रणेकडून करावी, अशी मागणी लोकजनशक्ती पार्टीने केली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी प्रदेश सरचिटणीस अशोक कांबळे, संजय चव्हाण, के.सी. पवार, संजय पाटील, माधव यादव उपस्थित होते. पुरवठा विभागाची चौकशी एका परिमंडळाने दुसऱ्या परिमंडळामार्फत करणे हा प्रशासकीय विनोद असून पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून ही चौकशी व्हायला हवी, असे संजय आल्हाट यांनी सांगितले.

अन्नधान्य वितरणातील भ्रष्टाचाराची मागणी लावून धरल्यावर दिवाळीपूर्वी पुण्यातील 11 परिमंडळांमध्ये 11 पथके स्थापन करण्याचा आदेश सहाय्यक विभागीय पुरवठा अधिकारी सुनंदा भोसले-पाटील यांनी काढला होता.

अन्नधान्य न मिळालेल्या शिधापत्रिका धारकांच्या परिमंडळ निहाय आलेल्या तक्रारींची चौकशी ही पथके करणार आहेत. रास्त धान्य दुकानांमध्ये अनियमितता आढळल्यास पंचनामे केले जाणार आहेत.

शासकीय कर्मचारी अथवा दुकानदार दोषी आढळल्यास कारवाई करून 2 आठवड्यात त्याचा अहवाल सादर करावा, असे या आदेशात म्हटले आहे. मात्र, प्रत्यक्षात चौकशी वेगळ्या गोष्टींची होत असून पुरवठा विभागच ती करीत असल्याची माहिती समोर आली.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत केंद्रसरकार कडून आलेल्या मोफत धान्न्याचा काळा बाजार करणाऱ्या अन्नधान्य वितरण अधिकारी पुणे शहर व पुणे जिल्हा तालुका पुरवठा अधिकारी , शहरातील सर्व परीमंडळ अधिकारी , सर्व रेशनिंग दुकानदार यांची न्यायालयीन समिती नेमून चौकशी करून दोषी वर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करीत लोकजनशक्ती पार्टीने 3 नोव्हेंबरला पुणे विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून केली होती.

दरम्यान, पुणे शहरातील नागरिक ज्यांना शिधापत्रिका असताना सुद्धा धान्य वितरण केले नाही त्या सर्व दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात यावे. तसेच, संबंधित सर्व परिमंडळ अधिकारी व सर्व रेशनिंग इनिस्पेक्टर, तालुका पुरवठा अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी व शहर पुरवठा अधिकारी यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.