Pimpri : यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाईच्या कंत्राटातील आक्षेपांची खातरजमा करणार – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्याची काढलेल्या 647 कोटी रुपयांच्या निविदेबाबत अनेक तक्रारी, आक्षेप आले आहेत. या तक्रारींची खातरजमा केली जाईल, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (शुक्रवारी) पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच त्याची छाननी प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे हे कंत्राट अंतिम होण्यास किती कालावधी लागेल हे सांगत येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेच्या 8 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या रस्त्यांची तसेच मुंबई – पुणे महामार्गाच्या दुतर्फा रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने दैनंदिन साफसफाई करण्यात येणार आहे. 1 हजार 670 किलोमीटर लांबीच्या रस्ते साफसफाई कामासाठी सहा विविध ‘पॅकेजेस’ मध्ये विभागणी करत 8 वर्ष कालावधीसाठी निविदा काढण्यात आली आहे. 647 कोटी रुपयांच्या कंत्राटात ‘रिंग’ झाल्याचे सकृतदर्शनी उघड झाले असून 6 पॅकेजसाठी 6 कंत्राटदारांनीच आलटून पालटून सहभाग घेतल्याचे तांत्रिक छाननीद्वारे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निविदा रद्द करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. याबाबतचे वृत्त ‘एमपीसी न्यूज’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर महापालिका वर्तुळात खळबळ उडाली होती.

याबाबत पत्रकारांनी विचारले असता आयुक्त हर्डीकर म्हणाले, यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाईची निविदा अभ्यासपूर्वक काढली आहे. शहराची मागणी, आर्थिकबाजू असा सर्व पर्यायांचा आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन निविदा प्रक्रिया केली आहे. मशीनच्या सहाय्याने साफफाईच्या निविदा काढल्यास किती खर्च येईल याचा अभ्यास केला आहे. रस्त्याची लांबी, मनुष्यबळ याचा आढावा घेऊनच निविदा प्रसिद्ध केली आहे. स्वच्छता झाली नाही. तर, कंत्राटदाराची जबाबदारी असणार आहे.

जेवढी रकमेची महासभेची मान्यता आहे. तेवढ्याच रकमेची निविदा काढली आहे. सात वर्षासाठी ही निविदा आहे. त्याचे मूल्यमापन आणि  छाननीची प्रक्रिया सुरु आहे. या निविदा प्रक्रियेबाबत आक्षेप, तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची खातरजमा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.