IPL 2021 : आयपीएलमध्ये बहरला पिंपरी-चिंचवडचा ‘ऋतु’!

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – चेन्नई सुपर किंग्ज संघाला आयपीएलमध्ये घवघवीत यश मिळवून देणारा ऋतुराज गायकवाड आहे आपल्या पिंपरी चिंचवड शहराचा सुपुत्र! या संपूर्ण स्पर्धेत 635 धावा करून प्रतिष्ठित ऑरेंज कॅप पटकावताना त्याने भल्याभल्या महान खेळाडूंना मागे टाकले आहे.

यंदाची आयपीएल स्पर्धा चेन्नई सुपरकिंग्जने मोठया दिमाखात जिंकून आयपीएलच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव चौथ्यांदा कोरले आहे. महान कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली सीएसकेने ही दैदिप्यमान कामगिरी केल्याने संपूर्ण क्रिकेटविश्व पुन्हा एकदा नव्याने माहीच्या प्रेमात पडलेले आहे आणि तो माही ज्याच्या प्रेमात पडलाय तो आहे आपल्या पिंपरी चिंचवड शहराचा सुपुत्र! नव्या दमाचा, आक्रमक, आकर्षक आणि जमिनीवर पाय घट्ट असलेला ऋतुराज गायकवाड!

या संपूर्ण स्पर्धेत 635 धावा करून प्रतिष्ठित ऑरेंज कॅप त्याने पटकावताना भल्याभल्या महान खेळाडूंना मागे टाकले आहे. त्यामुळेच त्याच्या या यशाची दखल महेंद्रसिंग धोनी सोबत समस्त क्रिकेट जगताला सुद्धा घ्यावीच लागली आहे.

31 जानेवारी 1997 रोजी जन्मलेल्या ऋतुराजचे वडील संरक्षण खात्यामध्ये तर आई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका आहे. मध्यमवर्गीय असूनही आई-वडिलांनी लेकराची आवड लक्षात घेतली आणि जोपासली सुद्धा. टीपीकल मध्यमवर्गीय कुटुंबात आधी पोटापाण्यासाठीची सोय बघ असे शिकवले जाते, पण या घरात मात्र आपल्या लेकाची आवड स्विकारली गेली आणि तिला योग्यरित्या खतपाणीही केले गेले, ज्यामुळे ऋतुराजने अल्पावधीतच आपल्या नावाचा डंका जोरदाररित्या वाजवला आहे.

नुकताच आपल्या दुसऱ्या संघाचा श्रीलंका दौरा झाला,ज्यात कर्णधार शिखर धवनने ऋतुराजचा अंतिम अकरा जणात समावेश करून त्याच्या प्रतिभेवर शिक्कामोर्तबही केले. त्याआधी वयाच्या विसाव्या वर्षी ऋतुराजने महाराष्ट्र संघाकडून रणजी मध्ये पदार्पण केले, तर 2018 मध्ये भारत ब संघाकडून देवधर या प्रतिष्ठित स्पर्धेतही पदार्पण केले.

त्याच वर्षी त्याने उत्तम आणि लक्षवेधी कामगिरी करून बेस्ट ACC आशिया टीमचा इमेर्जिंग खेळाडू म्हणून बक्षीस पटकावले. त्याच्या या कामगिरीने प्रभावीत होत चेन्नई सुपर किंग्जने त्याला 2018-19 च्या लिलावात करारबद्ध केले आणि 2020 पासून त्याच्या आयपीएल करीयरला सुरुवात झाली. त्याने 22 सामन्यात 839 धावा करताना चार अर्धशतके आणि एक शतक मारत आपली निवड किती योग्य होती हेच सिद्ध केले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील थेरगावच्या वेंगसरकर अकादमीमधून हा पुढे आलेला आपल्या शहराचा सुपुत्र आंतरराष्ट्रीय टी 20 खेळणारा एकमेव पिंपरी-चिंचवडकर ठरलेला आहे. एका साध्या कुटुंबातून आलेल्या ऋतुराजचे यश हे त्याच्या प्रामाणिक मेहनतीचेच फळ आहे.

आयपीएलच्या माध्यमातून जगभरातील महान गोलंदाजांचा सामना लिलया करणारा ऋतुराज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि कामचलाऊ ऑफब्रेक मंदगती गोलंदाज सुद्धा आहे. त्याच्या या देदिप्यमान यशाने आपल्या शहराची क्रिकेटच्या जागतिक पातळीवर नोंद करून दाखवलेली आहे.

ऋतुराजच्या या यशापासून आणखी नवोदित खेळाडू नक्कीच प्रेरणा घेतील, अशी आशा बाळगून ऋतुराजने यापुढे फक्त 20/20 तच नव्हे तर एकदिवसीय आणि कसोटी सामन्यातही भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करावे, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. त्याला मनापासून भरभरून शुभेच्छा देताना, तो आपल्या कामगिरीने असंख्य विक्रम आपल्या नावावर करेल, अशी खात्री वाटते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.