Sangavi News : वाचन उपक्रमांमधून बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपणे गरजेचे – सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे

एमपीसी न्यूज – राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा मूलमंत्र दिला असून आपल्या कार्याने भारतच नव्हे तर संपूर्ण जगाला वैचारिक दिशा दिलेली आहे. संपूर्ण जीवनभर समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य अलौकिक असून त्यांच्या विचारांना जाती-पाती मध्ये बांधणे हे अधोगतीपणाचे लक्षण आहे. त्याचबरोबर बाबासाहेबांच्या विचारांची माहिती विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या उद्देशाने बाबुरावजी घोलप महाविद्यालयातर्फे आयोजित सलग आठ तास वाचन व संशोधनात्मक लेखन उपक्रम स्तुत्य असून यामधून बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे चालण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले.

भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील ग्रंथालय विभाग आणि आयक्युएसी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सलग आठ तास ‘थोर पुरुषांचे चरित्र – आत्मचरित्र वाचन व संशोधनात्मक लिखाण’ या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. लतेश निकम, ग्रंथपाल लेफ्ट. विठ्ठल नाईकवाडी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या व्याख्यानाचे प्रास्ताविक करत असताना प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी सर्वप्रथम या उपक्रमाची संकल्पना व महत्व विशद केले. तसेच विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे असे नमूद करत डिजीटल युग व बदलत्या काळानुसार वाचनसंस्कृती कमी होत आहे अशी खंत व्यक्त केली. त्याचबरोबर वाचनाच्या माध्यमातून बाबासाहेबांची शिकवण अंमलात आणत त्यांच्या विचारांवर मार्गक्रमण करावे, असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त महाविद्यालयातर्फे आयोजित या सलग आठ तास वाचन उपक्रमामध्ये 131 विद्यार्थी व शिक्षकांच्या सहभागाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. परंतु अपेक्षेपेक्षा जास्त 300 विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे या उपक्रमामध्ये सहभाग नोंदविला. ज्यामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह थोर पुरूषांचे चरित्र व आत्मचरित्र वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आले. तसेच संशोधनाची आवड असलेल्या विविध विभागातील सुमारे 40 प्राध्यापकांनी या उपक्रमात सहभागी होत संशोधन निबंधाचे लेखन केले.

या उपक्रमाचे औचित्य साधत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी भारतीय प्रशासकीय सेवा अंतर्गत ओडिशा राज्यामध्ये काम करत आपल्या प्रशासकीय कामाचे अनुभव मांडलेले ‘मोर ओडिशा डायरी’ या पुस्तकांचा संग्रह सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते ग्रंथालयास भेट देण्यात आला. या उपक्रमाचे सूत्रसंचालन लेफ्ट. विठ्ठल नाईकवाडी तर आभार प्रदर्शन डॉ. लतेश निकम यांनी केले. सदर उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रणित पावले, किरण कळमकर, मनिषा कुंभार, योगेश मदने, बाबाजी गायकवाड, सुनिता गडकर, वीरेन चव्हाण यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.