Pimpri News : मालमत्ताकरांचे बिले पोस्टाने येणार घरी; 18 लाखांचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील मालमत्ताधारकांना सन 2022-23 या आर्थिक वर्षातील मालमत्ताकराचे बिले थेट पोस्टाने घरी येणार आहे. एका बिल पोस्ट करण्यासाठी 3 रुपये 20 पैसे खर्च येणार आहे. शहरातील 5 लाख 71 हजार मालमत्ताधारकांना बिल पाठविण्यासाठी 18 लाख 27 हजार 200 रुपये खर्च येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला आज (बुधवारी) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहरातील 5 लाख 71 हजार मालमत्तांची महापालिकेकडे नोंद आहे. महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागामार्फत शहरातील इमारती व जमिनींवर मालमत्ता कराची आकारणी करण्यात येते. 16 विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून कर वसुलीचे काम केले जाते. 2022-23 हे आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. मालमत्ताकराचे उत्पन्न वाढविण्यासाठी एप्रिल महिन्यातच मालमत्ताकरांची बिले पाठविण्यात येणार आहेत. त्यासाठी बिलांची छपाई करुन मालमत्ताधारकांना वितरीत केली जाणार आहेत.

पुण्यातील विश्रामबागवाडा येथील पोस्ट ऑफीसच्या व्यवस्थापकांनी मालमत्ताकराची बिले माफक दरात वितरित करण्यास इच्छुक असल्याचे कळविले आहे. भारत सरकारच्या पोस्ट खात्यामार्फत सर्व करांसहित एक बिल वितरित करण्यासाठी 3 रुपये 20 पैसे खर्च होणार आहेत. पाच लाख 71 हजार मालमत्ताधारकांना बिल पाठविण्यासाठी 18 लाख 27 हजार 200 रुपये खर्च येणार आहे.

बिले वाटपासाठी टपाल खर्च लेखाशिर्षावर तरतूद कमी आहे. पोस्टमास्तर पुणे यांना 18 लाख 27 हजार रुपये अदा करण्यास हा खर्च टपाल खर्च लेखाशिर्षातून करणे आवश्यक आहे. तथापि, टपाल खर्च या लेखाशिर्षावर सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 5 लाखाची तरतूद उपलब्ध आहे. बिले पाठविण्यासाठी 18 लाख 27 हजार रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे मिळकत सर्व्हेक्षण या लेखार्शिषावर उपलब्ध असलेल्या 10 कोटी रुपयांच्या तरतूदीमधून 20 लाखांची तरतूद टपाल खर्च या लेखार्शिर्षावर वर्ग करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.