ITI Admission News : आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेला आजपासून प्रारंभ

शासकीय आयटीआयमध्ये 92 हजार, खाजगी आयटीआयमध्ये 44 हजार जागा उपलब्ध

एमपीसीन्यूज : राज्यातील  417  शासकीय आणि 549  खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी (आयटीआय) आज प्रवेशप्रक्रिया सुरु झाली. राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते या प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला. यंदा शासकीय आयटीआयमध्ये 92 हजार तर खाजगी आयटीआयमध्ये 44 हजार अशा एकूण 1  लाख 36  हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या कार्यालयात आज जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रवेश प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी, सहसंचालक योगेश पाटील यांच्यासह ऑनलाईन पद्धतीने राज्यातील आयटीआयचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी आदी उपस्थित होते.

प्रवेश प्रक्रिया सुरु होताच अवघ्या काही वेळातच 15  इच्छूक उमेदवारांनी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज केले. संचालनालयाच्या https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशप्रक्रिया सुरु झाली.

एकुण 91 प्रकारचे व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध असुन 80 अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण तर 11 अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण वा अणुत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनासुद्धा कौशल्य प्रशिक्षण मिळून त्यांनी स्वत:च्या पायावर उभे रहावे यासाठी त्यांना 11 अभ्यासक्रमांमध्ये संधी देण्यात येत आहे.

सर्व शिक्षण मंडळांचा इयत्ता दहावीचा निकाल लवकरच अपेक्षित आहे. दहावीचे निकाल घोषित झाल्यानंतर सविस्तर प्रवेश वेळापत्रक संचालनालयामार्फत प्रकाशित करण्यात येईल. तोपर्यंत प्रवेश निश्चितीसाठी आवश्यक कागदपत्रे प्राप्त करुन घेणे तसेच प्रवेश अर्ज भरण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज आजपासून उपलब्ध करुन देण्यात येत आहे, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

प्रवेश प्रक्रिया, नियमावली, पध्दती, आवश्यक कागदपत्रे, संबंधीत शासन निर्णय, विविध योजना, संस्थांची यादी, अभ्यासक्रम, प्रवेश पात्रता, इत्यादींबाबत इत्यंभूत माहिती https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. हरकती नोंदविणे, विकल्प अर्ज भरणे, ऑनलाईन स्वरुपात प्रवेश अर्ज शुल्क भरणे इत्यादी सुविधा अर्जदारांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच प्रवेश अर्ज “MahaITI App” या मोबाईल ॲपच्या आधारे भरण्याची सुविधा देखिल उपलब्ध करुन देण्यात येत आहे. राज्यातील इच्छूक पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन मंत्री श्री. मलिक यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.