शनिवार, ऑगस्ट 20, 2022

Jnana Prabodhini Navnagar Vidyalaya: मागे वळून पाहताना…

जवळपास तीन तपांपूर्वी निगडी प्राधिकरणात ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्राची पायाभरणी करून आपल्या अथक परिश्रमाने शैक्षणिक क्षेत्रात उच्च स्थान प्राप्त करून देणारे केंद्र प्रमुख वामनराव तथा भाऊ अभ्यंकर हे नुकतेच निवृत्त झाले. `माणूस घडविण्यासाठी शिक्षण` हे व्रत घेऊन कार्यरत राहिलेल्या वामनराव यांची ज्येष्ठ पत्रकार राजन वडके यांनी भेट घेतली असता त्यांनी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दांत…

मागे वळून पाहताना… 

1963 ते 1983 अशी 20 वर्षे  मी नूमवि आणि ज्ञानप्रबोधिनी अशा `बुद्धिमंतां`च्या शाळेत काम करत होतो. नूमवि आणि ज्ञानप्रबोधिनीत  गुणात्मक फरक फार कमी आढळला. ज्ञानप्रबोधिनीत सुमारे 18 वर्षे काम केल्यावर निगडीला आलो. तेव्हा असं वाटलं आपण सर्वसामान्य मुलांच्या शाळेत आलो. तस म्हटलं तर दोन पायऱ्या खाली उतरून आलो. या दोन्ही शाळांत `99 पर्सेंटाइल रँक`चे जे विद्यार्थी आहेत त्यांना निवडलेलं असायचं. इथे शंभारातील सगळेच तसे नव्हते. हा फरक असल्याने यात शैक्षणिकदृष्ट्या काही फरक होतो का, हे पाहायचं होतं.

त्यामुळे ज्ञान प्रबोधिनीची मुळातील नेतृत्त्व विकसन वगैरे जी उद्दीष्टं होती ती जशीच्या तशी इथं वापरण शक्य नव्हतं. ज्या मुलांना मला शिकवायचं आहे. त्यांची मुळातील ऊर्जा आणि आपल्याला अपेक्षित ऊर्जा याचा अंदाज घेतच पुढ जाणं आवश्यक होतं. हा माझ्या दृष्टीने नवा अनुभव होता. ज्ञान प्रबोधिनीच्या शिक्षणाचा अप्पा पेंडसे यांच्या सहवासाचा, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंदांसारख्या महापुरुषांच्या चरित्राच्या अभ्यासाचा परिणाम असेल, पण ज्याला आपण सामान्य म्हणतो, ते सुद्धा देशाच्या भूमिकेसाठी काही हातभार लावू शकतात आणि त्यांनी तो हातभार उचलला पाहिजे. आपल्याला देशभक्तीसाठी शिकायचंय ही भावना मनांत ठेवून शिक्षणाची भूमिका मुलांपर्यंत पोचवणं. त्यांच्या मनांत ही भावना निर्माण करण्यासाठी सर्वसामान्य मुलांसाठीच्या शिक्षणाचे मार्ग कोणते आहेत हे शोधायचं होतं.

मेहरूणकरांचं उत्स्फूर्त सहकार्य 

शाळा उभारणीसाठी अर्थसाह्य इथूनच निर्माण करायचं होत. त्यासाठी येथील मोठे आणि मध्यम उद्योगांशी सतत संपर्क येत गेला. ज्यांना शैक्षणिक विषयाबाबत ओढ आहे. त्यांना भेटत गेलो. अशा काहीतरी उद्देशाने शाळा चालली पाहिजे ,याचे तत्कालीन टेल्को कंपनीचे वरिष्ठ अधिकारी वा. द. मेहरूणकर यांना पुष्कळ अप्रूप वाटतं असे. ते म्हणत, तुम्हाला गरजेप्रमाणे पैसे मिळत जातील त्यासाठी जे आवश्यक आहे ते मी करीन. त्यांनी सुमारे दहा ते बारा उद्योजकांना त्यांच्या स्वाक्षरीने आमच्या शाळेच्या मदतीसाठी पत्र लिहिली. हे त्यांनी उत्स्फूर्तपणे केलेले साह्य होतं. त्यामधून अर्थसाह्याचा ओघ सुरू झाला.

चिंता पैशांची नव्हती मात्र, आपल्या शाळेतून पुढे जाणारी मुलं इतर शाळांतील मुलांपेक्षा वेगळी असली पाहिजेत यासाठी चिंतन करत अेक लोकांशी बोलत होतो. दहा वर्षांत काही तुकड्या बाहेर पडल्या औद्योगिक क्षेत्रांत जिथे आमची मुलं गेली तिथे जाणवलायला लागलं की या शाळेतील मुले वेगळी आहेत. ही मला पावती होती.

दशकपूर्तीच्या कार्यक्रमाला उद्योजक नवलमल फिरोदिया प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी शाळेसाठी 50 हजार रुपये बक्षीस म्हणून दिले. तुम्ही फक्त अप्पासाहेबांचं नाव सांगता, की अप्पासाहेबांचं काम करता, हे मी पाहात होतो. तुम्ही अप्पासाहेबांच्या भूमिकेतून काम करता आहात, असं मला वाटत गेलं, असं ते कार्यक्रमाला येण्यापूर्वी म्हणाले होते.

ज्यांनी देशाला उद्योगाची दृष्टी दिली अशा टाटांपासून किर्लोस्कर उद्योजकांच्या जीवनावर 1985 मध्ये व्याख्यानमाला आयोजित केली. त्याचाही परिणाम झाला.  इथून जे विद्यार्थी बाहेर पडले त्यातील किमान 10 ते 15 विद्यार्थ्यांनी या उद्योजकांच्या पद्धतीने काम सुरू केले. शाळेच्या काही विद्यार्थीनीसुद्धा मोठमोठ्या उद्योगांमध्ये अधिकारी, संचालकपदावर जाऊन पोचल्या आहेत.

त्यामुळे इथल्या शिक्षणात जो वेगळेपणा यावा असं वाटत होतं. त्याची चुणूक दिसून आली. शिक्षणाची अशी दृष्टी ठेवली तर शिक्षण हे अधिक अर्थपूर्ण होत जातं. तसं ते अर्थपूर्ण व्हाव असा प्रयत्न पहिल्या दिवसापासून होत गेला. शिक्षकांचंही चांगले सहकार्य मिळत गेलं.

मातृमंदिर

मातृमंदिर हे सुरुवातीला बांधलेली इमारत आहे. नवनगर विद्यालयाचं उद्दीष्ट काय, इथं शिकणारा विद्यार्थी हा मातृभूमीचं काम करण्यासाठी मी शिकतो आहे. अशा तऱ्हेची भावना मनात ठेवून शिकणारा असायला हवा. विद्यार्थ्यांनी मातृभूमीला शरण गेलं पाहिजे. तिची आठवण सतत ठेवली पाहिजे. नवनगर विद्यालयाच्या शिक्षणाला हा हेतू देण्याचा प्रयत्न मातृमंदिराच्या माध्यामतून घडला.

उद्दीष्ट आणि साध्य

मी क्रियाशील आणि बारीक-सारीक गोष्टींचा विचार करून काम करत होतो. मातृमंदिर झालं, शाळेची इमारत झाली, तंत्र शिक्षणाची इमारत झाली. संगणक प्रशिक्षणाची सर्व  व्यवस्था झाली. इमारत ही इमारत नसते. आधी गरज मग पुरवठा, प्रत्येक गोष्ट सहेतूकच केली.  व्यायामशाळा झाली.

शैक्षणिक उत्कृष्टता ही कधीच महत्त्वाची मानली नाही. 1995 मध्ये शालांत परीक्षेत शाळेची विद्यार्थिनी पुणे विभागात पहिली … रोषणाई करू … नको! ज्यानी या देशाच्या वैभवात काही ना काहीतरी भर टाकलेली आहे, असं होण्याची स्थिती जेव्हा येईल, तेव्हा रोषणाई करू. तेव्हा आम्हाल जे करायचं होतं ते साधलं बाबा, मी म्हणेन आत्ता त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न अवश्य केलेला आहे. दहा पावलं चालली असली तरी ती आनंदाने समाधानाने चालली, कमी केलं की जास्त केलं हा विचार कधी केला नाही. कारण ज्ञानप्रबोधिनीची अनेक आव्हाने, की ती बुद्धिमंतांची शाळा आहे. आणि ही सामान्य मुलांची शाळा आहे. त्याच्या तोडीला कुठे तरी वर चढत जायचंय हे करत जायचंय. आम्ही मार्गावर आहोत. एवढंच या निमित्ताने सांगतो.

शैक्षणिक क्षेत्राची विद्यमान परिस्थिती

सध्या शिक्षक हा एक नाजूक घटक झाला आहे. शिक्षक कसा असावा, हे आपण कोणी किंवा समाजाची गरज ठरवत नाही. तर राजकारण ठरवतं, ही सर्वांत खेदजनक गोष्ट आहे. ज्यांना शिक्षक व्हावसं वाटतं त्यांना विविध बंधनांमुळे शिक्षक होता येत नाही. ज्यांना शिक्षक होण्यात मुळीच रस नाही ते दुसरं काहीच नाही म्हणून  शिक्षक होतात. शिक्षक हा सर्वांत कमकुवत घटक झाला आहे.

नवनगर विद्यालयाला जवळपास दहा वर्षे अनुदान नव्हते. त्याचा प्रेरणासंपन्न शिक्षक मिळवण्याचा आम्हाला फायदा झाला. अतिरिक्त शिक्षक येथे पाठवायचे असे सध्या होऊ लागलं आहे. त्याच्या परिणामामुळे हे शिक्षक उद्दीष्टांनुसार काम करू शकतील, असं सांगता येत नाही. ही शिक्षण क्षेत्राची वैचारिक कीड आहे.

विद्यार्थी हे जसे घडवू तसे घडतात. त्यांना घडविण्याची युक्ती शाळेकडे असू शकते. शिक्षणक्षेत्रात विद्यार्थी वाह्यात झाले, तर त्याची जबाबदारी समाजावर टाकण्याची गरज नाही. ती शाळेने घ्यावी. चांगले झाले तर त्याचेही श्रेय शाळेने घ्यावे. आपला मुलगा हा फक्त पैसे मिळवणारा झाला म्हणजे पालकांना समाधान होतं. त्याने काही विशेष काम करावं, अशी कल्पनाही पालक करत नाहीत.

ज्याला स्वतःच्या आयुष्याला उद्दीष्ट सापडलं नाही, अशा शिक्षित असूनही अडाणी असलेल्या पालकांची ही भूमिका शिक्षण क्षेत्र दूषित किंवा प्रदूषित करायला कारणीभूत ठरते. शालेय कामावर शासकीय दबाव वाढवणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल मला खेद वाटतो.

समाधानानं मरता येईल, असं जीवन जगा

आपल्याला माणसाचं जीवन एका अर्थानं अनवधानाने मिळतं. मनुष्यप्राणी म्हणून जन्मलो असलो तरी चांगला माणूस म्हणून मरेन. जमलं तर माझ्या जीवनाकडे बघून लोकांनी कसं जगाव हे ठरवावं, असा माणूस म्हणून मरीन असा प्रयत्न करा, असं मी विद्यार्थ्यांना सांगत असतो.

सगळ्याच लोकांनी अशा पद्धतीने त्यांच्या क्षमतेप्रमाणे वाटचाल करत राहावं, म्हणजे खऱ्या अर्थाने आपलं शिक्षण झालं. जीवन तुमच्या इच्छेनं मिळालं नसलं तरी, तुमच्या इच्छेने तुम्हाला समाधानानं मरता येईल. त्यासाठी जेवढं काही करता येण्यासारखं असेल तेवढं करावं, असं मला सांगावसं वाटतं.

– वा. ना. अभ्यंकर

(शब्दांकन – राजन वडके)

spot_img
Latest news
Related news