Kalewadi : काळेवाडीची खुशी बनली महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाची कर्णधार

एमपीसी न्यूज – काळेवाडी येथील (Kalewadi) खुशी मुल्ला या महिला खेळाडूची 19 वर्षांखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली असल्याने औद्योगिक तसेच क्रिडानगरी असलेल्या पिंपरी चिंचवड शहरासाठी ही अतिशय अभिमानास्पद बाब असून त्यामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडली आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले, तसेच खुशी मुल्ला या क्रिकेटच्या इतिहासात दैदिप्यमान अशी कामगिरी करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

खुशी मुल्ला या महिला क्रिकेट खेळाडूची महाराष्ट्राच्या 19 वर्षांखालील महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. या निमित्ताने खुशी यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस भेट दिली. त्यादरम्यान त्यांचा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.

त्यावेळी ते बोलत होते. सत्काराच्या वेळी क्रिडा अधिकारी अनिता केदारी, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, व्हेरॉक (Kalewadi) वेंगसरकर क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक शादाब शेख तसेच खुशी मुल्ला यांचे वडील नवीलाल मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते संजय गायके आदी उपस्थित होते.

खुशी मुल्ला यांनी थेरगाव येथील व्हेरॉक वेंगसरकर अकादमी येथे 10 वर्षांपुर्वी प्रवेश घेऊन क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. त्यांनी 16 वर्षाखालील, 19 वर्षाखालील, 13 वर्षाखालील गटात महाराष्ट्र क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व केले, त्यांना भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शनही लाभले आहे.

वेराॅक वेंगसरकर अकादमीचे क्रिकेट प्रशिक्षक शादाब शेख यांनी बोलताना महानगरपालिकेने क्रिकेट खेळासाठी प्रशस्त मैदान तसेच सरावादरम्यान पावसाने व्यत्यय येऊ नये यासाठी बंदिस्त इनडोअर हॉल उपलब्ध करून दिल्यामुळे सराव करण्यास सुलभता निर्माण झाली.

त्यामुळेच खुशी मुल्ला ही उदयोन्मुख खेळाडू तयार झाली असून अनेक खेळाडूही प्रशिक्षण घेत आहेत, असे सांगून भविष्यात खुशी मुल्ला या भविष्यात क्रिकेटमध्ये फक्त शहराचेच नव्हे तर देशाचेही नाव उंचावणारी कामगिरी करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कर्णधार खुशी मुल्ला म्हणाल्या, लहाणपणापासूनच मला क्रिकेटची आवड होती. मोठा भाऊ देखील राष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळायचा त्यामुळे साहजिक क्रिकेटविषयी आवड व प्रेम निर्माण झाले. माजी भारतीय कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी थेरगाव येथे व्हेरॉक वेंगसरकर अकादमीची स्थापना केली.

तसेच त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शनही केले. अकादमीमध्ये भव्य क्रिकेट मैदान आहे तसेच शादाब शेख यांच्यासह इतर श्रीकांत कल्याणी,भूषण सुर्यवंशी,डाॅ.विजय पाटील या मार्गदर्शकांनी माझ्याकडून उत्तम सराव करून घेतल्याने माझा आत्मविश्वास वाढला आणि माझी कर्णधारपदी निवड झाली.

Maharashtra : जागतिक सुमो कुस्ती स्पर्धेसाठी दिनेश गुंड जपानला रवाना

या गोष्टीचा मला अतिशय आनंद होत असून पिंपरी चिंचवड शहरातून माझी निवड झाल्याने शहराच्या नावलौकिकात भर पाडण्यात मी निश्चितच जास्तीत जास्त प्रयत्न करेन, असा विश्वासही खुशी मुल्ला यांनी व्यक्त केला.

खुशीला लहाणपणापासूनच क्रिकेटची आवड होती. मोठा भाऊ अमन मुल्ला याने क्रिकेटमध्ये 19 वर्षांखालील महाराष्ट्र क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. त्याच्यापासूनच खुशीने प्रेरणा घेतली तसेच दिलीप वेंगसरकर यांनी वैयक्तिक लक्ष देऊन वेळोवेळी खुशीला मार्गदर्शनही केले. त्यामुळेच ती गौरवास्पद कामगिरी करू शकली, असे खुशीचे वडील नवीलाल मुल्ला यांनी सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते संजय गायके यांनी काळेवाडी पिंपरी येथील घराशेजारी राहणाऱ्या नवनियुक्त महिला क्रिकेट कर्णधार खुशी मुल्ला या खेळाडूचे तिच्या कामगिरीबद्दल कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.