Karachi Flight Crash: पाकिस्तानमध्ये भीषण विमान दुर्घटना, 97 प्रवाशांसह उतरणारे विमान इमारतींवर कोसळले, मोठी जिवीतहानीची भीती

Karachi Flight Crash: Horrific plane crash in Pakistan, plane carrying 97 passengers crashes on buildings before landing, fears of major casualties

एमपीसी न्यूज – पाकिस्तानात एक भीषण विमान दुर्घटना झाली आहे. लाहोरहून कराचीला येणारे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे विमान 97 प्रवासी घेऊन लँडिंग करीत असताना विमानतळाजवळील रहिवाशी भागात कोसळले. लँडिंगला केवळ एक मिनिट बाकी असताना कराचीमधील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ही दुर्घटना घडली. विमान कोसळल्यामुळे अनेक इमारतींना आग लागल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

पाकिस्तानी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार पीआयए ‘एअरबस ए ३२०’ प्रकारातील हे विमान  आहे. या विमानात 85 प्रवासी, 12 क्रू मेंबर्स असे एकूण 97 जण होते.  करोना व्हायरसमुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यात येत आहेत, त्यामुळे प्रवासी संख्या कमी होती असे पाकिस्तानातील एका पत्रकाराने सांगितले. ईदसाठी हे खास विमान सोडण्यात आले होते. ईदच्या पार्श्वभूमीवर हा अपघात झाल्याने जगभर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मॉडेल कॉलनी जवळच्या जिना गार्डन भागात हे विमान कोसळले. टीव्हीवरील दृश्यांमध्ये रहिवाशी इमारतींचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत आहे तसेच घटनास्थळावर आग लागली असून धुराचे लोळ उठताना दिसत आहे. नेमकी जिवीतहानी किती झाली ते पाकिस्तानी यंत्रणेने अजून स्पष्ट केलेले नाही. पण अपघातस्थळी गोंधळ आणि भितीचे वातावरण आहे.

लँडिंगच्या मिनिटभरआधी या विमानाशी संपर्क तुटल्याचे पाकिस्तानातील सीएएकडून सांगण्यात आले. विमानाचे इंजिन काम करत नसल्याने दुसऱ्या इंजिनवर शिफ्ट होत असल्याचा शेवटचा संदेश अपघातग्रस्त विमानाच्या वैमानिकाने विमानतळाच्या कंट्रोल रुमला दिला होता, मात्र त्यानंतर काही क्षणातच हा अपघात झाला.

स्थानिक प्रशासनाला मदत करण्यासाठी पाकिस्तानी रेंजर्स आणि पाकिस्तानी लष्करच्या तात्काळ कृती दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. अनेक घरांचे नुकसान झाले आहे. विमानतळाजवळचा परिसर अरुंद गल्ल्यांचा आहे. त्यामुळे रुग्णवाहिका, अग्निशमन दलाला मदतकार्य करताना अडथळे येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.